नवी दिल्लीः देशातील लॉकडाऊन वाढवण्यात आल्याने रेल्वे आणि विमान सेवा ३ मेपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. रेल्वे सुरू होणार असल्याच्या अफवेनेच मुंबईत वांद्रे येथे स्थलांतरीत मजुरांची गर्दी झाली होती. पण रेल्वेने मंगळवारी रात्री पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. संपूर्ण देशात ३ मेपर्यंत सर्व रेल्वे गाड्या बंद आहेत. नागरिकांनी गर्दी करू नये. कुठलीही विशेष ट्रेन धावणार नाहीए. रेल्वे मंत्रालयाने आपल्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिलीय. तसंच अफवा पसरवू नये असं आवाहनही केलंय.

३९ लाख तिकीटं रद्द होणार

लॉकडाऊन वाढवल्याने १५ एप्रिल ते ३ मेपर्यंतची सर्व तिकीटं रेल्वेला रद्द करावी लागणार आहेत. जवळपास ३९ लाख तिकीटं रद्द करावी लागतील. २१ दिवसांचा लॉकडाऊन १४ एप्रिलला संपणार असल्याने १५ तारखेपासून रेल्वे सेवा सुरू होतील या अपेक्षेने रेल्वेने तिकीटांचे बुकींग सुरू केले होते. यामुळे ३९ लाख तिकीटांचे बुकींग झाले होते. देशातील १५ हजार रेल्वेतून दररोज जवळपास २ कोटी नागरिक प्रवास करतात.

मालगाड्यांची वाहतूक सुरू राहणार

लॉकडाऊनमुळे रेल्वे सेवा बंद असली तरी मालगाड्यांची वाहतूक मात्र सुरू आहे. अत्यावश्यक सेवा आणि वस्तुंचा नागरिकांना सुरळीत पुरवठा करण्यासाठी मालगाड्यांची वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. तसंच पुढील आदेश येईपर्यंत तिकिटांचे बुकींग होणार नाही आणि आधी बुक झालेली तिकीटं रद्द करण्यासाठी ऑनलाइन सुविधा सुरू राहतील, असं रेल्वेने स्पष्ट केलंय.

तिकिटाचे सर्व पैसे परत मिळणार

रेल्वेच्या बुकींग केलेल्या आधीच्या तिकीटांचे सर्व पैसे प्रवाशांना परत केले जातील. युटीएस, पीआरएससह सर्व तिकीट बुकींग काउंटर पुढील आदेश येईपर्यंत बंद राहील. तीन मेपर्यंत ऑनलाइन तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांचे पैसे त्यांच्या अकाउंवर जमा केले जातील. आणि काउंटरवरून तिकीट बुक केलेल्या प्रवाशांना ३१ जुलैपर्यंत पैसे परत घेता येतील, असं रेल्वेने स्पष्ट केलंय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here