गांधीनगरः गुजरातमधील काँग्रेसचे आमदार इम्रान खेडावाला हे करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. इम्रान खेडावाला हे अहमदाबादमधील जमालपूर-खाडिया मतदारसंघातील आमदार आहे. खेडावाला यांनी मंगळवारी सकाळीच मुख्यमंत्री विजय रुपाणी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि गृह राज्यमंत्री प्रदीप सिंह जाडेजा यांची गांधीनगरमधील सचिवालयात भेट घेतली होती. यामुळे गुजरात हादरलं आहे.

रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर काँग्रेस आमदार इम्रान खेडावाला यांना एसव्हीपी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येणार आहे. खेडावाला यांच्या मतदारसंघात करोनाचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे हा परिसर हॉटस्पॉट घोषित करून सील करण्यात आला आहे.

अहमदाबादमधील जमालपूर भाग करोनाच्या विळख्यात सापडला आहे. यामुळे जमालपूर-खाडियाचे आमदार इम्रान खेडावाला नागरिकांच्या मदतीसाठी पुढे सरसावले. पहिल्या दिवसापासून ते आपल्या मतदारसंघातील नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करत होते. खेडावाला यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी शैलेश परमार आणि गयासुद्दी शेख हे दोन आमदारही सोबत होते. यानंतर त्यांनी अनेक पत्रकारांशी संवाद साधला. यामुळे करोनाचा संसर्ग इतरांनाही होण्याची भीती आहे.

खेडावाला यांनी भेट घेतल्यामुळे आता मुख्यमंत्री रुपाणी, उपमुख्यमंत्री पटेल यांच्यासह पत्रकारांनाही क्वारंटाइन व्हावं लागणार आहे. काँग्रेसचे काही आमदारही खेडावाला यांच्या संपर्कात आले होते. त्यांनाही क्वारंटाइन व्हावं लागणार आहे. या घटनेनं गुजरात हादरलं आहे.
गुजरातमधील करोना मृतांची संख्या २८वर

गुजरातमध्ये करोनाची लागण झालेल्या आणखी दोन जणांचा मृत्यू झाला. यामुळे राज्यातील मृतांची एकूण संख्या २८ इतकी झाली आहे. एका ५० वर्षीय व्यक्तीचा भावनगरमध्ये आणि ५८ वर्षीय व्यक्तीचा बडोद्यात मृत्यू झाला आहे. भावनगरमधील रुग्णाला मधुमेह होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here