मुंबई/कोल्हापूर: शिवसेनेनं राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संजय पवार यांचं नाव निश्चित केलं आहे. या जागेवरून संभाजीराजे छत्रपती शिवसेनेच्या पाठिंब्यानं राज्यसभेत जातील अशी चर्चा असताना शिवसेनेनं पवार यांचं नाव जाहीर केलं. शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी तीन ते चार नावं शर्यतीत होती. यातलं पवारांचं नाव सर्वाधिक आश्चर्यकारक होतं. अखेर त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झालं.

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याकडे असलेल्या अतिरिक्त मतांच्या आधारे राज्यसभेवर जाऊ, असं संभाजीराजे छत्रपतींचं गणित होतं. मात्र शिवसेनेनं वेगळा पवित्रा घेतला. मातोश्रीवर या, शिवबंधन बांधा, मग राज्यसभेच्या उमेदवारीचा निर्णय घेऊ, असा निरोप संभाजीराजेंना देण्यात आला. मात्र काल दुपारपर्यंत संभाजीराजे मातोश्रीवर गेले नाहीत. यानंतर शिवसेनेनं राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी उमेदवार देण्याची तयारी सुरू केली.
संजय पवारांविरोधात धनंजय महाडिक? भाजपची खेळी, निवडणूक राज्यसभेची, मल्ल कोल्हापूरचे!
राज्यसभेसाठी माजी खासदार चंद्रकांत खैरे, आढळराव पाटील, अभिनेत्री उर्मिला मांतोडकर यांची नावं चर्चेत होती. मात्र अचानक ही नावं मागे पडली आणि संजय पवार यांचं नाव चर्चेत आलं. कट्टर शिवसैनिक अशी त्यांची ओळख आहे. पवार यांचं नाव निश्चित करून शिवसेनेनं सर्वसामान्य शिवसैनिकाला पक्षात मानाचं स्थान असल्याचा संदेश दिला.
म्हणून ठाकरेंकडून राज्यसभेसाठी संजय पवारांचं नाव फायनल; निवडीमागची कारणं काय?
राज्यसभेसाठी नाव चर्चेत असल्याची माहिती संजय पवार यांना माध्यमांतून समजली. पक्षानं आदेश दिल्यास राज्यसभा लढवू. मात्र प्रमुख नेत्यांकडून तसे कोणतेही संकेत अद्याप तरी मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितलं. पक्षासाठी काम करत राहू, असंही ते म्हणाले. यानंतर पवारांना मुंबईतून फोन गेला. पुण्यात या, असा निरोप देण्यात आला. पवारांनी पुणे गाठलं.

संजय पवार यांचं नाव चर्चेत आल्यानंतर संभाजीराजेंनी घाईघाईत सकाळी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. उद्धवजींचं आणि आमचं ठरलंय, अशी मोजकी प्रतिक्रिया देत त्यांनी सस्पेन्स वाढवला खरा पण तोपर्यंत शिवसेनेने आपला पुढचा प्लॅन आखला होता. मुंबईच्या दिशेनं निघा, असा पुढचा निरोप संजय पवारांना देण्यात आला. त्यानुसार सकाळीच संजय पवार मुंबईच्या दिशेने रवाना झाले. दुपारी ३ वाजता ते मुंबईत पोहोचले. शिवालय इथे जाऊन त्यांनी खासदार अनिल देसाई यांची भेट घेतली.

संजय राऊतांनी संजय पवार यांच्या नावाची घोषणा केल्यावर संजय पवार यांनी देखील माध्यमांना मोठ्या आनंदात प्रतिक्रिया दिली. शिवसेना पक्षप्रमुखांनी ठरवलंय, मावळ्याला मैदानात उतरवायचं तर मावळा लढायला खंबीर आहे, सैनिक फक्त मातोश्रीच्या आदेशाची वाट पाहतो, अशी सेना स्टाईल प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. इकडे तोपर्यंत संभाजीराजे मुंबईत दाखल झाले होते. संभाजीराजे मुख्यमंत्र्यांना वर्षावर भेटणार, अशा बातम्या माध्यमांनी चालवल्यावर काही निवडक पत्रकारांशी बोलताना संभाजीराजेंनी भेट घेणार नसल्याचं स्पष्ट करत अजूनही सेनेकडून मला अपेक्षा आहे, अशी आशा बोलून दाखवली.

बाळासाहेबांचा आशीर्वाद आणि उद्धवजींचा विश्वास, मी आज भरुन पावलो : संजय पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here