देशात महागाईचा भडका उडाला आहे. इंधनाचे दर वाढले आहेत. यामुळे सामान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. आता महागाई विरोधात डाव्या संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मुंबई : केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे महागाई प्रचंड वाढली असून, बेरोजगारांच्या फौजा देशभरात निर्माण झाल्या आहेत, असा आरोप करून राज्यातील डाव्या पक्षांनी २५ ते ३१ मेदरम्यान देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अशोक ढवळे यांनी मंगळवारी ही माहिती दिली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, लाल निशाण पक्ष आणि भारताचा कम्युनिस्ट पक्ष (माले-लिबरेशन) यांच्या नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय ऑनलाइन बैठकीत आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. २५ ते ३१ मेदरम्यान राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालयांवर नागरिकांच्या वतीने मोर्चे आणि निदर्शने करीत केंद्रातील भाजपच्या नागरिकविरोधी, कॉर्पोरेटधार्जिण्या आणि धर्मांधतेला उत्तेजन देणाऱ्या धोरणाचा निषेध करावा असे आवाहन या बैठकीत करण्यात आल्याचे ढवळे म्हणाले.