म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : राज्यसभा निवडणुकीसाठी राज्यातील राजकीय हालचाली हळूहळू वेग घेत आहेत. काँग्रेसने गेल्यावेळी परराज्यातील नेत्यांना संधी दिल्याने यावेळी गृहराज्यालाच जागा द्यावी, अशी आग्रही भूमिका राज्यातील काही नेत्यांनी घेतल्याचे समजते.

याबाबत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशीही संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यसभेतील राज्यातील सहा जागांपैकी संख्याबळाच्या आधारे काँग्रेसला एक जागा मिळणार आहे. यासाठी रस्सीखेच सुरू असून ‘जी- २३’ मधील नेतेही राज्यातून इच्छुक असल्याचे पक्ष वर्तुळात बोलले जात आहे. पक्षाचे सरचिटणीस मुकुल वासनिक, अविनाश पांडे, उत्तमसिंह पवार यांच्या नावाची चर्चा सुरू असून पी. चिदम्बरम कायम राहतील का, याचाही अंदाज घेतला जात आहे. महाराष्ट्रात बरेच नेते इच्छुक आहेत. विनाकारण विरोध दिसू नये, म्हणून राज्यसभेसाठी राज्यातील अनेक नेत्यांनी सावध भूमिका घेतली आहे. कुणाच्याही हालचाली दिसत नाही. त्यामुळे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी कानोसा घेतला जात आहे. उमेदवारीचा अंतिम निर्णय श्रेष्ठी घेणार असल्याने मोर्चेबांधणीसाठीही अतिशय गुप्तता बाळगली आहे. गुप्तपणे सुरू असलेल्या हालचालींबाबत कुणीही बोलण्यास तयार नाही. तसेच, राज्यसभेची जागा असल्याने नेत्यांची नाराजी नको म्हणून जाहीरपणे समोर येण्याचे अनेकांनी टाळले.

प्रदेश काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या सुरुवातीला झालेल्या चर्चेत स्थानिक नेत्यांनाच संधी द्यावी, यावर भर देण्यात आला. हाच आधार घेऊन त्या दिशेने काही नेत्यांनी प्रयत्न सुरू केले. ज्येष्ठ नेते रणजित देशमुख यांचा अमृत महोत्सवी सत्कार व काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलचे प्रशिक्षण शिबिर येत्या रविवारी होणार आहे. यानिमित्त दिग्गज नेते येणार आहेत. यात राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि उमेदवारीसाठी चर्चेत असलेले मुकुल वासनिक यांचा पूर्वनियोजित दौरा आहे. मात्र, राज्यसभेचे उमेदवार निश्चित करण्यात येणार असल्याने त्यांचा दौरा अनिश्चित झाला. उमेदवाराची घोषणा श्रेष्ठींनी केली तरी, त्यावर स्वाक्षरी वासनिक यांची असते. त्यामुळे उमेदवाराची घोषणा केव्हा होते, याकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here