भारताच्या अंतर्गत सुरक्षेसाठी आणि संभाव्य प्रादेशिक धोक्यांचा सामना करण्याच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी अमेरिकेने भारताला हार्पून बनावटीची हवेतून मारा करणारी जहाजविरोधी क्षेपणास्त्रे आणि मार्क ५४ ही पाणबुडीतून मारा करणारी कमी वजनाची क्षेपणास्त्रे भारताला विकण्याचा निर्णय अमेरिकेने जाहीर केला आहे. एकूण १५ कोटी ५० लाख डॉलरची ही क्षेपणास्त्रे आहेत. अमेरिकेने भारताला २०१६मध्ये प्रमुख संरक्षण भागीदार असल्याचा दर्जा दिला होता. या दर्जामुळे भारताला अमेरिकेकडून अत्याधुनिक आणि संवेदनशील तंत्रज्ञान विकत घेता येऊ शकते. उभय देशांतील हा करार दक्षिण चीन समुद्रात चीनच्या दादागिरीला रोखण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.
असा होणार सौदा
हार्पून बनावटीच्या हवेतून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांची किंमत नऊ कोटी २० लाख डॉलर असून, पाणबुडीतून मारा करणाऱ्या कमी वजनाच्या १६ एमके ५४ क्षेपणास्त्रांची; तसेच पाणबुडीतून मारा करणाऱ्या अन्य प्रकारच्या तीन एमके ५४ क्षेपणास्त्रांची किंमत ६ कोटी ३० लाख डॉलर एवढी आहे. अमेरिकेच्या संरक्षण सुरक्षा कॉर्पोरेशनने दोन वेगवेगळ्या अध्यादेशांमधून ही माहिती दिली.
प्रादेशिक समतोल वाढणार
– हार्पून क्षेपणास्त्रे ही बोइंग कंपनीने उत्पादित केली असून, पाणबुडीविरोधी क्षेपणास्त्रांचा पुरवठा रेथॉन कंपनीकडून होणार आहे.
– अमेरिकेकडून विक्री करण्यात येणाऱ्या या शस्त्रास्त्रांमुळे प्रादेशिक असमतोल होणार नाही, असे पेंटॅगॉनने म्हटले आहे.
– प्रस्तावित विक्री ही अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धोरणाचाच एक भाग असून, त्यामुळे भारत-अमेरिकेची धोरणात्मक भागीदारीही बळकट होईल, असेही अमेरिकेने म्हटले आहे.
अलीकडील काळात भारताची खरेदी
रशिया – एस-४००, टी-९० रणगाडे, हेलिकॉप्टर
अमेरिका – अपाचे, चिनूक हेलिकॉप्टर, पी-८आय सागरी विमाने
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times