नागपूर: राज्यसभेतील सहाव्या जागेवरून अपक्ष लढण्यास इच्छूक असलेले संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न होत असल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. ज्याप्रकारे पहिल्यांदा शरद पवार (Shrad Pawar) यांनी हा विषय सुरु केला, नंतर हा विषय ज्या दिशेने गेला त्यामुळे या सगळ्याला वेगळे वळण लागले आहे. मला असं वाटतं की त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून झालेला आहे. मात्र, हा त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे, मी त्याबद्दल बोलणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. ते बुधवारी नागपूरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य करून संभाजीराजे यांच्या कोंडीसाठी थेट शरद पवार यांना जबाबदार धरले आहे. त्यामुळे आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस काय प्रतिक्रिया देणार, हे पाहावे लागेल. तर दुसरीकडे मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनीही संभाजीराजे यांची फसवणूक झाल्याचा आरोप केला. संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी काहीतरी रणनीती आखली असेल. तुम्हाला महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळेल हे, त्यांना कोणी सांगितले? हा मध्यस्थ कोण होता, त्यांच्यात काय बोलणी झाली, हे संभाजीराजे यांनी जाहीर करावे. जेणेकरून संभाजीराजे यांची फसवणूक कोणी केली, हे शिवभक्तांना कळेल, असे विनोद पाटील यांनी म्हटले.
राज्यसभेसाठी मनसे आमदाराचा संभाजीराजे छत्रपतींना पाठिंबा, पाहा काय म्हणाले…
संभाजीराजेंना भाजप पाठिंबा देणार?

राज्यसभा निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत राज्यसभा निवडणुकीच्या जागांबाबत बराच खल झाला. या बैठकीअंती भाजप पक्षश्रेष्ठींनी राज्यसभेच्या तिसऱ्या जागेबाबतचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांना देऊ केले आहेत. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभा निवडणुकीत पाठिंबा द्यायचा किंवा नाही, याचा निर्णय आता सर्वस्वी देवेंद्र फडणवीस यांच्या हातात असल्याचे समजते.

ही जागा लढवायची की नाही, याबाबत भाजपने अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही. याच जागेवर संभाजीराजे छत्रपती यांनी दावा सांगितला आहे. त्यामुळे ही जागा लढवून मराठा समाजाचा रोष पत्कारायचा अथवा संभाजीराजे छत्रपती यांना पाठिंबा देऊन छत्रपतींच्या घराण्याचा सन्मान राखायचा, याबाबत अद्याप भाजपचा निर्णय झालेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here