दगडाने ठेचून केला खून…
शहरातील पिंप्राळा रेल्वे गेटजवळील रेल्वेच्या मालधक्का परिसरातच गोडाऊनसमोर मध्यरात्री एका तरूणाचा खून झाल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार रात्रगस्तीवरील पेालिस घटनास्थळी दाखल झाले. परिसरात चौकशी करुन त्यांनी राजमालती नगरातील काही हमालांना बोलवून या मृतदेहाबाबत माहिती दिल्यावर एकाने मयत तरुणाची ओळख पटवून तरुणाचे घर दाखविले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश रमेश गायकवाड यांनी घटनास्थळ गाठले. मयत हा आपला मुलगा अनिकेत असल्याचे निष्पन्न झाल्यावर गायकवाड कुटुंबियांनी घटनास्थळीच आक्रोश केला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आला. सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करुन कुटूंबीयांना मृतदेह सोपवण्यात आला आहे. याप्रकरणी मयत अनिकेतचे वडील गणेश गायकवाड यांच्या तक्रारीवरुन शहर पेालिसांत खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत अनिकेत याच्या पश्चात वडील, आई सारिका, व लहान भाऊ विशाल असा परिवार आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन ज्या दगडाने खून केला तो जप्त केला आहे.
दारु प्यायला बोलावले, दारु पाजली अन् केला गेम…
अनिकेत हा मिस्तरी काम करायचा. मंगळवारी रात्री अनिकेत एका ठिकाणी हळदीच्या कार्यक्रमासाठी गेला होता. त्याठिकाणाहून सागर समुद्रे व सुमित शेजवळ यांनी त्याला फोन करुन पिंप्राळा मालधक्क्यावर बोलावून घेतले. त्याठिकाणाहून त्या तिघांनी शहरातील एका हॉटेलमधून दारु खरेदी केली तर शाहू नगरातून दारु पिण्यासाठी ग्लास व पाण्याची बॉटल घेवून ते पुन्हा मालधक्क्यावर आले. अन तिघांनी याठिकाणी सोबत दारु प्राशन केली. याठिकाणी सागरचे मित्राच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. याबाबत अनिकेत याने मुलीचा भाऊ असलेल्या मित्राला सागरच्या प्रेमसंबंधाबाबत सांगितले होते. हा राग सागरच्या मनात होता.
पोलिसांची पुढील कारवाई सुरु आहे…
या रागातून सागर व सुमीत या दोघांनी अनिकेतला बोलावून दारु पाजली त्याच्यावर चॉपरने सपासप वार करत दगडाने ठेचून त्यांचा खून केला. अशी माहिती पोलिसांच्या चौकशी समोर आली आहे. खून केल्यानंतर दोघं संशयितांनी घटनास्थळाहून पळ काढला. मात्र, मध्यरात्रीतूनच शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सागर बाळू समुद्रे व सुमित संजय शेजवळ या दोघांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांची पुढील कारवाई सुरु आहे.