दावोस: भारतानं गहू निर्यात रोखण्याचा निर्णय घेतल्यामुळे जगभरात खळबळ माजली आहे. निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिवा यांनी केली आहे. शक्य तितक्या लवकर निर्यात बंदीचा पुनर्विचार करण्याचं आवाहन जॉर्जिवा यांनी केलं आहे.

भारतानं आठवड्याभरापूर्वी गव्हाची निर्यात रोखण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाबद्दल जगभरातून चिंता व्यक्त आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख असलेल्या क्रिस्टालिना जॉर्जिवा यांनीही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये भारताच्या निर्णयाबद्दल काळजी व्यक्त केली. भारतासारखाच विचार जगातील इतर देशदेखील करू शकतात. त्यामुळे जागतिक स्तरावर अडचणी वाढतील आणि या अडचणींचा सामना करण्यास जग सज्ज नाही, असं जॉर्जिवा म्हणाल्या.

भारताची स्थिती मी समजू शकते. त्यांना १३५ कोटी लोकांचं पोट भरायचं आहे. उष्णतेच्या लाटांमुळे तिथे गव्हाचं उत्पादन कमी झालं. त्यांची अडचण मी समजू शकते. पण माझी भारताला विनंती आहे. त्यांनी गव्हावरील निर्यात बंदीचा पुनर्विचार करावा. कारण अनेक देश भारताच्या पावलावर पाऊल टाकू शकतात. त्यामुळे धान्य पुरवठ्याचं संकट अधिक गहिरं होऊ शकतं, अशी भीती जॉर्जिवा यांनी बोलून दाखवली.

भारतानं निर्यात बंदी हटवल्यास किती मदत होऊ शकते, असा प्रश्न जॉर्जिवा यांना विचारण्यात आला. त्यावर रशिया आणि युक्रेन यांच्यात तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम गव्हाच्या पुरवठ्यावर झाल्याचं त्यांनी सांगितलं. किती गहू निर्यात करू शकतो आणि कोणकोणत्या देशांना पुरवठा करू शकतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. भारतानं इजिप्त आणि लेबॅनॉनसारख्या देशांना गहू निर्यात केल्यास खूप मोठा फरक पडेल. कारण या देशांमध्ये गव्हाची कमतरता आहे. या देशांसमोर उपासमारीचं संकट उभं ठाकलं आहे. त्यामुळे सामाजिक अशांतता निर्माण होऊ शकते. तसं घडल्यास जागतिक शांतता धोक्यात येईल, असं जॉर्जिवा म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here