मुंबई- ‘उदाहरणार्थ नेमाडे’, ‘त्रिज्या’, ‘स्थलपुराण’ अशा अत्यंत वेगळ्या अशा मराठी सिनेमांचं दिग्दर्शन करत सोलापूरच्या अक्षय इंडीकर यानं स्वतःची ओळख निर्माण केली आहे. अक्षयच्या कामाची चर्चा, त्याच्या कामाची दखल घेत त्याचं कौतुक आंतरराष्ट्रीय पातळीवर करण्यात आलं. आता अक्षय बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी सज्ज झाला आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याच्या धर्मा प्रॉडक्शनसाठी काम करण्याची संधी अक्षयला मिळाली. त्याला मिळालेल्या या संधीचा आनंद अक्षयनं फेसबुकवर पोस्ट करत व्यक्त केला आहे.

धर्मा प्रॉडक्शनचा सर्वेसर्वा असलेल्या करण जोहर यानं काल त्याचा ५० वा वाढदिवस साजरा केला. करणच्या वाढदिवसाचं औचित्य साधत अक्षयनं त्याला खास पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.याच पोस्टमधून अक्षयनं तो करण जोहर आणि त्याच्या धर्मा प्रॉडक्शनबरोबर काम करणार असल्याची आनंदाची बातमीही शेअर केली.


अक्षयची फेसबुक पोस्ट

अक्षयनं फेसबुकवर लिहिलेली पोस्ट सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाली आहे. अक्षयनं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ‘ज्या माणसाबद्दल फक्त ऐकून होतो. लहानपणापासून ‘कुछ कुछ होता है’ अगणित वेळा बघितला होता. देशातल्या एवढ्या मोठ्या बॉलिवूड नामक प्रकरणाचा खरा बादशहा जर कोण असेल तर तो हा माणूस. मला कधीच वाटलं नव्हतं मी करण जोहर च्या धर्मा प्रोडक्शनसोबत काम करेल आणि हे स्वप्न बघण्याचं पण काही कारण नव्हतं. पण काही स्वप्नं आपल्या नकळत आपण मनाशी बाळगत असतो. स्वतः दिग्दर्शक असलेल्या स्वतःच्या कंपनीत शेकडो नव्या फिल्ममेकरला संधी देणारा हा माणूस अनेक तरुण फिल्म मेकरला उभं करतोय. आमची पहिली भेट त्याच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या पार्टीत होईल असं वाटलं नव्हतं. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा करण जोहर सर.’


अक्षयनं त्याच्या पोस्टमधून धर्मा प्रॉडक्शनसाठी तो काम करत असल्याची बातमी युझर्सना समजल्यावर त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तसंच भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

करण- अक्षय

दरम्यान, करण जोहरनं त्याच्या ५० व्या वाढदिवसाची जंगी पार्टी यशराज स्टुडिओमध्ये दिली. या पार्टीला बॉलिवूडमधील सर्व कलाकार आवर्जून उपस्थित होते. त्यामध्ये आमिर खान- किरण राव, ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, कियारा आडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, मलायका अरोरा, अर्जुन कपूर यांच्यासह अनेक कलाकार पार्टीला हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here