नेमकं काय घडलं?
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील हनुमान नगर भागातील बेपत्ता असलेल्या तरूणाचा मृतदेह आढळला. कुर्तडी शिवारातील कालव्याच्या पाण्यात गुरुवार २६ मे रोजी दुपारी तो मृतावस्थेत सापडला आहे. शंकर नाथोजी कोठुळे (वय २२ वर्ष ) असे या तरुणाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दोन दिवसांपासून बेपत्ता
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आखाडा बाळापूर येथील हनुमान नगर भागातील शंकर कोठूळे हा आखाडा बाळापूर येथील खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. मंगळवारपासून ( ता. २४ ) तो बेपत्ता होता. त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला मात्र तो सापडला नाही. त्यानंतर या प्रकाराची माहिती आखाडाबाळापुर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनीही त्याचा शोध सुरू केला होता.
अखेर ओळख पटली
दरम्यान आज दुपारी कुर्तडी शिवारातील कालव्यामध्ये एका तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून आखाडाबाळापुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार शेख बाबर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटली नाही. त्यामुळे पोलिसांनी मृतदेह सापडल्याची माहिती सोशल मीडियावर टाकली होती. तसेच पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या शंकरच्या कुटुंबियांनाही घटनास्थळी बोलविण्यात आले. त्याच्या कुटुंबियांनी सदर मृतदेह शंकरचा असल्याचे सांगितले.
दरम्यान मयत शंकर कोठुळे याने आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही समजू शकले नाही. या प्रकरणी आखाडाबाळापुर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गे आणि बायसेक्शुअल पुरुष मंकीपॉक्सच्या जाळ्यात; शरीर विछिन्न करणाऱ्या आजाराबाबत नवी माहिती समोर