रत्नागिरी : शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याभोवती सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने कारवाईचा फास आवळला आहे. गुरुवारी परब यांचे सरकारी निवासस्थान आणि वांद्रे येथील राहत्या घरासह संबंधित तब्बल ७ ठिकाणी एकाचवेळी छापा टाकण्यात आला. मुंबईसह पुणे व कोकणातील ठिकाणांचा या छाप्यात समावेश होता. दापोली येथील रिसॉर्टमध्येही ईडी पथक दाखल झाले होते. या रिसॉर्टमध्ये रात्री उशिरापर्यंत ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येत होती.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेली तक्रार आणि केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या कारवाईनंतर दापोली तालुक्यातील मुरूड साई रिसॉर्ट चर्चेत आले. याच रिसॉर्टमध्ये ईडीचे अधिकारी चौकशीसाठी गुरुवारी सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी दाखल झाले होते. ईडीच्या या कारवाईने जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात खळबळ उडाली. सकाळपासून सुरू झालेली चौकशी रात्री उशिरा जवळपास पावणेदहा वाजेपर्यंत सुरू होती. दरम्यान मुरूड येथील या साई रिसॉर्टशी आपला कोणताही संबंध नसल्याचा दावा अनिल परब यांनी केला आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत; लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने

काय आहे आरोप?

विभास साठे यांच्याकडून अनिल परब यांनी दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्याला लागून असलेली जागा खरेदी केली होती. काही दिवसांनी परब यांनी ही जागा खेड येथील त्यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांनी विकली. त्यावर सदानंद कदम यांनी अलिशान असे साई रिसॉर्ट उभा केले. हे रिसॉर्ट बांधताना सीआरझेड कायद्याचा भंग करण्यात आल्याची तक्रार भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केंद्रीय वन, पर्यावरण मंत्रालयाकडे केली होती. या तक्रारीनुसार पर्यावरण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी मुरूड येथे जाऊन पाहणी केली आणि पर्यावरण मंत्रालयाला अहवाल सदर केला होता. त्यानंतर पर्यावरण कायद्याचा भंग करून बांधण्यात आलेले हे साई रिसॉर्ट तोडून टाकावे, असे आदेश पर्यावरण मंत्रालयाने दिले होते आणि दापोली न्यायालयात यासंदर्भात एक खटलाही दाखल केला आहे.

दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुरुड येथील ही जागा उद्योजक सदानंद कदम यांना विकलेली असली तरी त्यामध्ये परब यांचे हितसंबंध असल्याचे आरोप किरीट सोमय्या यांनी वारंवार केले आहेत. मध्यंतरी आयकर विभागाने केलेल्या चौकशीत साई रिसॉर्ट बांधण्यासाठी केलेल्या खर्चाबाबतही माहिती घेतली होती. या पार्श्वभूमीवर गुरुवारी मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित ठिकाणांवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापे मारले आहेत. या चौकशीत नेमकी कोणती माहिती ईडीच्या हाती लागली आहे, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here