वृत्तसंस्था, बंगळुरू : मनी लाँड्रिंगप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यावर आरोपपत्र दाखल केले आहे. मात्र, ‘सन २०२३मध्ये राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माझ्यावर अशा प्रकारे राजकीय अस्त्राचा वापर केला जात आहे,’ असा आरोप शिवकुमार यांनी या आरोपपत्रानंतर केला आहे.

‘राजकीयदृष्ट्या सत्ताधाऱ्यांना जे अडचणीत आणू पाहात आहेत किंवा त्यांच्यापुढे शरणागती पत्करण्यास तयार नाहीत, अशांना नेस्तनाबूत करण्याच्या कटाचा हा भाग आहे. तरीही जे काही होईल, त्याला सामोरे जाण्यास मी तयार आहे,’ असा दावा शिवकुमार यांनी केला आहे. ईडीने सप्टेंबर २०१८मध्ये मनी लाँड्रिंगच्या एका प्रकरणात शिवकुमार यांच्यासह नवी दिल्लीतील कर्नाटक भवनमधील कर्मचारी हौमान्थैया आणि अन्य जणांवर गुन्हा दाखल केला होता. करचुकवेगिरी आणि हवाला व्यवहारांचा ठपका ठेवत प्राप्तिकर विभागाने शिवकुमार आणि अन्य जणांवर बेंगळुरूतील न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

अनिल परब यांच्याशी संबंधित रिसॉर्टवर ईडीकडून तब्बल १६ तास कसून चौकशी; कोणती माहिती हाती लागली?

या आरोपपत्रावर आधारित हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवकुमार आणि त्यांचे सहकारी एस. के. शर्मा यांनी अन्य तीन आरोपींच्या मदतीने हवालाच्या माध्यमातून नियमितपणे मोठ्या प्रमाणावर बेहिशोबी रकमेची वाहतूक केल्याचा आरोप प्राप्तिकर विभागाने केला आहे. ईडीने याप्रकरणी २०१९मध्ये शिवकुमार यांना अटक केली होती. याप्रकरणी त्यांची मुलगी ऐश्वर्या आणि काँग्रेसच्या आमदार लक्ष्मी हेब्बालकर यांची चौकशीही करण्यात आली होती. सध्या शिवकुमार हे जामिनावर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here