राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या छत्रपती संभाजीराजे यांनी अखेर या लढाईतून माघार घेतल्याचे जाहीर केले आहे. यावेळी संभाजीराजे यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आपली फसवणूक झाल्याचा आरोप केला. सगळं काही ठरलेलं असताना मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला, मात्र त्याचवेळी अनेक अपक्ष आमदारांनी मला फोन करुन पाठिंबा दर्शवल्याचं संभाजीराजेंनी आवर्जून सांगितलं. यामध्ये एमआयएम आमदाराने दिलेला पाठिंबा राजेंसाठी महत्त्वाचा होता.
राज्यसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करून घेण्यासाठी १० आमदारांचे अनुमोदन लागते. अनेक पक्षाच्या आमदारांनी तसेच अपक्ष आमदारांनी संभाजीराजेंना फोन करुन पाठिंबा दर्शवला. यादरम्यान धुळ्याचे एमआयएमचे आमदार फारुक शहा (Dhule MIM MLA Farooq Shah) यांनी संभाजीराजेंना फोन करुन आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. आपल्या मराठा स्वीय सहाय्यकाच्या माध्यमातून त्यांनी संभाजीराजेंना फोन केला. छत्रपतींविषयी आपल्या मनातील भावना त्यांनी फोनवरुन सांगितल्या. मला आपल्याला पाठिंबा द्यायचाय, अनुमोदनासाठी सही करायला कधी येऊ ते मला कळवा, एका मावळ्याला छत्रपतींची सेवा करायचीय, असं त्यांनी संभाजीराजेंना सांगितलं.
दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदेंनी देखील संभाजीराजे राज्यसभेवर गेले पाहिजेत, यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. परंतु सगळं काही ठरलेलं असताना, अगदी संभाजीराजे-शिवसेना यांच्यादरम्यान ड्राफ्ट बनलेला असताना माशी कुठे शिंकली आणि संभाजीराजेंची कुठली गोष्ट शिवसेनेला खटकली, याचं कोडं मात्र उलगडलं नाही.