नागपूर येथील एका तरुणानं रवी राणा यांना फोन केला आणि त्यांना हनुमान चालीसा म्हणूनच दाखवा असा आग्रह केला. हा फोन फेसबुकवरून लाईव्ह करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये हा तरुण प्रथमत: आमदार रवी राणा यांच्यासोबत बोलायचं आहे असं सांगतो. त्यावर आमदार रवी राणा उत्तर देतात की, आमदार साहेबांचे सर्व फोन मीच उचलतो. बोला काय काम आहे?, असा प्रश्न विचारतात.
समोरचा तरुण महत्त्वाचं काम आहे असं सांगून बोलायला सुरुवात करतो. इथून आमदार रवी राणा आणि फारुख कादरी नामक नागपूर येथील तरुणाचा संवाद सुरू होतो. प्रथमत: या संवादातून हा तरुण आमदार रवी राणा यांना आग्रह करतो की तुम्ही हनुमान चालीसा म्हणूनच दाखवा आणि यावर या दोघांमध्ये शाब्दिक वाद हळूहळू टोकाला जात असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
…अन् नवनीत राणा हनुमानाच्या प्रश्नावर क्लीन बोल्ड
एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान विचारण्यात आलेल्या एका साध्या प्रश्नावर नवनीत राणा आणि रवी राणा यांची चांगलीच पंचाईत होताना दिसली. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता. या व्हिडिओत कार्यक्रमाची सूत्रसंचालिका नवनीत राणा यांना एक प्रश्न विचारला. तुम्ही हनुमानाची इतकी भक्ती करता. मग मला एक सांगा की, हनुमानाचं नाव हनुमान कसं पडलं? हा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर नवनीत राणा बुचकाळ्यात पडल्या. एरवी त्यांना कायम प्रॉम्प्टिंग करणाऱ्या रवी राणा (Ravi Rana) यांच्याकडेही त्यांनी पाहिले. मात्र, कदाचित त्यांनाही या प्रश्नाचे उत्तर माहिती नसावे. या सगळ्यामुळे राणा दाम्पत्याची चांगलीच अडचण झाली.
यावर कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिकेने पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारला. हनुमानाचं नाव पहिले हनुमान नव्हतं, ते कसं पडलं, असे नवनीत राणा यांना विचारण्यात आले. त्यावर नवनीत राणा यांनी म्हटले की, तुम्ही आता इतिहासात नेत असाल तर आम्ही हनुमानाविषयी माहिती घेऊ. या सगळ्याचा इतिहास पुन्हा वाचू. मी हनुमान चालीसा वाचते, त्याविषयी मी नक्की बोलू शकेन, असे उत्तर नवनीत राणा यांनी दिले. मात्र, एकूणच परिस्थिती पाहता या प्रश्नावर राणा दाम्पत्य क्लीन बोल्ड होताना दिसले.
हनुमान चालिसा म्हणूनच दाखवा; रवी राणांना तरुणाचं आव्हान, क्लीप व्हायरल