मुंबई: वांद्रे येथे कामगारांचा उद्रेक झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झालेले असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांनी राजकीय पक्षांना सबुरीचा सल्ला दिला आहे. देशावर करोनाचं संकट आलं आहे. करोनाशी लढताना कोणीही राजकारण करू नये. करोनाचा पराभव हाच आपला एककलमी कार्यक्रम असायला हवा, असं आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. तसेच करोनाचा परिणाम सुमारे दोन वर्ष सोसावा लागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

शरद पवार यांनी आज राज्यातील जनतेशी फेसबुकद्वारे संवाद साधत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच देश आणि राज्यातील सद्यस्थितीवरही त्यांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी वांद्रे येथील घटनेवरही भाष्य केलं. वांद्रे येथील प्रसंग दुर्देवी होता. कुणीतरी आवई उठवल्याने लोक वांद्रे स्टेशन जवळ मोठ्या प्रमाणावर जमले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यात आलेले नाहीत. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल अशा सूचना देऊ नका. अफवा पसरवू नका आणि वांद्र्यात जे घडलं त्याची राज्यात कुठेही पुनरावृत्ती घडता कामा नये, असं सांगतानाच राजकीय संघर्ष आपण नेहमी करत असतो. त्यात काही चुकीचं नाही. लोकशाहीत असा संघर्ष होतच असतो. पण सध्या देशात संकट असताना राजकारण करणं योग्य नाही. देशात कुणाचं सरकार आहे आणि राज्यात कुणाचं सरकार आहे, याचा विचारही मनात आणता कामा नये. करोनाचा पराभव हाच आपला एककलमी कार्यक्रम असायला हवा, असं पवारांनी म्हटलं आहे.

अनेक कामगार घरी जाण्यासाठी आग्रही आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून सर्वच खबरदारी घेत आहेत. सेवाभावी संस्था मजुरांच्या जेवणाची व्यवस्था करत आहेत. सर्वच राजकीय पक्ष मतभेद बाजूला ठेवून काम करत आहेत. हे चांगलं चित्रं आहे. अशा विचित्र परिस्थिती अस्वस्थ लोकांना आपण सहकार्य केलं पाहिजे, असंही पवार म्हणाले.

केंद्र आणि राज्य सरकारला सहकार्य करा

करोनाचं संकट हे जागतिक संकट आहे. त्याचा धीराने सामना करायला हवा. योग्य नियोजन करूनच हा लढा दिला पाहिजे, असं सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही सूचना केल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा वेळोवेळी सूचना देत आहेत. या सर्व सूचनांचं पालन केलं पाहिजे. ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. तो आपल्या सर्वांच्या हिताचाच निर्णय आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारला संपूर्ण सहकार्य करा, असं आवाहनही पवार यांनी केलं. यावेळी त्यांनी वयोवृद्धांना काळजी घेण्याचं आवाहनही केलं. तसेच अमेरिका आणि इटलीत परिस्थिती भयावह आहे. युरोप, अमेरिकेशी भारताची तुलना करता येणार नाही. पण देशात ३७७ लोक दगावले असून हा आकडा चिंताजनक आहे, असंही त्यांनी सांगितलं.

उद्योग जगताने कामगारांना कामावरून काढून टाकू नये असं पंतप्रधानांनी आवाहन केलं आहे. पंतप्रधानाच्या या आवाहनाला सहकार्य करा. कामगारांची काळजी घ्या, असं आवाहनही त्यांनी केलं. राज्यात आणि देशात बेरोजगारीचं दुसरं संकट येणार आहे. त्याला सर्वांना सामोरे जावं लागणार आहे. तसेच मे महिन्यात राज्यात काही ठिकाणी पाणी टंचाईचं संकटही उद्भवणार आहे. त्याचीही खबरदारी घ्यावी लागणार असल्याचं पवारांनी सांगितलं.

आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आपल्या निश्चितपणे वेळ लागणार आहे. एक दोन वर्षे तरी याचा परिणाम जाणवेल, असं सांगतानाच केंद्राने अनेक निर्णय घेतले आहे ते चांगले आहे. पण, आरबीआयने काही सूचना दिल्या आहे. राज्य सरकारने जे बँकाकडून कर्ज घेतले आहे, त्याबद्दल अटी शिथील केल्या पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here