जळकोट तालुक्यातील लाळी खुर्द येथे अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. लग्न सोहळ्यासाठी लाळी खुर्द येथे आलेले तीन पाहुण्याकडील मुले आंघोळीसाठी कोल्हापुरी बंधाऱ्यात गेले होते. आंघोळ करत असताना पाय निसटून तिघांचाही बुडून मृत्यू झाल्याची घटना २७ मे रोजी सकाळच्या सुमारास घडली. या तिघांचे मृतदेह शोधण्यास उदगीर येथील अग्निशमन दलाला यश आले आहे.
नेमकं काय घडलं?
जळकोट तालुक्यातील लाळी खुर्द येथे दिनांक २७ मे रोजी तुळशीदास तेलंगे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याचे सकाळी ११ वाजता आयोजन करण्यात आले होते. लग्नाची सर्व तयारी करण्यात आली होती. या विवाह सोहळ्यासाठी तेलंगे कुटुंबीयांचे पाहुणे रात्रीच दाखल झाले होते. या लग्नासाठी आलेले संगमेश्वर बंडू तेलंगे (वय १३ वर्ष), चिमा बंडू तेलंगे (वय १५ वर्ष, रा . चिमेगाव तालुका कमलनगर आणि एकनाथ हनुमंत तेलंगे (वय १५ वर्ष, रा . निडेबन उदगीर) हे तिघेही जण आंघोळीसाठी तिरु नदीवर असलेल्या लाळी खुर्द येथील बंधाऱ्याकडे गेले. आंघोळ करत असताना एकाचा पाय निसटला आणि तो बंधाऱ्यात गेला. यानंतर एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करताना तिघेही जण पाण्यात बुडाले. या बंधाऱ्यामध्ये खूप पाणी असल्यामुळे त्यांना वर येता आले नाही व यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दरम्यान गावकऱ्यांनी सुरुवातीला मृतदेह काढण्याचे प्रयत्न केले परंतु खूप पाणी असल्यामुळे त्यांना मृतदेह काढता आले नाहीत. यावेळी या घटनेची जवळचे तहसीलदार सुरेखा स्वामी यांना माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ उदगीर येथील अग्निशमन दलाशी संपर्क साधून अग्निशामक दलाला पाचारण केले. यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी पाण्यामध्ये उतरुन तिघांचे मृतदेह शोधले. घटनास्थळी तात्काळ तहसीलदार सुरेखा स्वामी, पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम, मंडळ अधिकारी सुरेवाड, तलाठी उमाटे यांनी भेट दिली. ज्या ठिकाणी कोल्हापुरी बंधाऱ्यामध्ये मुले बुडाली होती. त्या ठिकाणी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती.
विवाहाच्या दिवशी लाळी खुर्द येथील बंधाऱ्यात बुडून पाहुण्याकडील तीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे तेलंगे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या सोबतच संपूर्ण लाळी खुर्द गावावर दु:खाचे सावट आहे.
शरद पवारांचा दगडूशेठला बाहेरुनच नमस्कार; नॉनव्हेज खाल्ल्याचं सांगत मंदिरात जाणं टाळलं