नागपूर : हनुमान चालीसा पठणावरून आज, शनिवारी शहरातील वातावरण भक्तिमय होणार असले तरी राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या त्यांचे पती आमदार रवी राणांसह नागपुरात येत असून यानिमित्त युवा स्वाभिमान पक्ष रामनगर मैदानात हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम घेणार आहे. याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही दुपारी १२ ते २ या वेळेत हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम घेण्याचे जाहीर केले आहे.

मातोश्रीसमोर हनुमान चालीसा म्हणण्यासाठी मुंबईला गेलेले राणा दाम्पत्य त्या घटनेनंतर आज, शनिवारी पहिल्यांदाच विदर्भात येत आहेत. त्यांच्या स्वागतानिमित्त शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. दरम्यान, युवा स्वाभिमानच्यावतीने विमानतळावरून शहराच्या प्रमुख मार्गावरून काढण्यात येणाऱ्या रॅलीची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे. राणा दाम्पत्य रामनगरातील हनुमान मंदिरामागील मैदानात सामूहिक चालीसा पठण कार्यक्रमात सहभागी होतील. नंतर ते अमरावतीकडे रवाना होतील.

मान्सून आगमनाची तारीख बदलली; महाराष्ट्रात कधी दाखल होणार? जाणून घ्या…

त्याचवेळी शहर राष्ट्रवादी काँग्रेसने याच मंदिरात दुपारी १२ ते २ या वेळात हनुमान चालीसा पठण, सुंदरकांड आणि हवनचे आयोजन केले असून त्यासाठी ११ पुजारी आणि ४० भोंगे अशी जय्यत तयारी केली आहे. याबाबत माहिती देताना राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार म्हणाले, ‘महागाई, बेरोजगारीपासून देशाच्या जनतेला दिलासा देण्याची सद्बुद्धी केंद्र सरकारला यावी म्हणून आम्ही हनुमानाला साकडे घालत आहोत. आमचा हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम मागच्या शनिवारी ठरला होता. परंतु, राष्ट्रवादीचे नेते शहराबाहेर असल्याने तो पुढे ढकलण्यात आला. त्याची सूचना अंबाझरी पोलिस ठाण्याला पत्राद्वारे २५ मे रोजी देण्यात आली आहे.’

नवनीत राणा याच मंदिरात प्रार्थना करणार आहेत आणि तुम्हीसुद्धा त्याचवेळी पठण करणार आहात, यावर बोलताना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे म्हणाले, ‘कोणीही कोणत्याही मंदिरात पूजा-पाठ करू शकतो. आमचे आधीच ठरले होते. आमचा कार्यक्रम झाल्यानंतर ते करतील. त्यात काहीच वावगे नाही. परंतु, आमच्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी घुसखोरी केल्यास राष्ट्रवादी ते खपवून घेणार नाही. जशास तसे उत्तर देण्याची धमक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.’ आपला संघर्ष अटळ असल्याचे संकेत पेठेंनी यातून दिले.

भोंग्यांचा वापर टाळा!

शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राणा दाम्पत्याला रामनगरातील हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठणासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कुणालाही भोंग्याचा वापर करता येणार नाही. मंदिरात हनुमान चालीसा पठणासाठी परवानगीची गरज नाही. मात्र, बाहेर कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे काही अनुचित घटना घडणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना दोन्ही आयोजकांना देण्यात आली आहे. याखेरीज राणा दाम्पत्याने विमानतळ ते मंदिरापर्यंत रॅली काढण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, ती नाकारण्यात आली. सुरुवातीला राष्ट्रवादीतर्फे हनुमान चालीसा पठण केले जाईल. त्यानंतर राणा दाम्पत्याला परवानगी दिली जाईल, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here