Agriculture News : सध्या राज्यातील शेतकरी अनेक अडचणींचा सामना करत आहेत. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. मागच्या 8 दिवसांपासून नाफेडने परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील 17 शासकीय हरभरा हमीभाव खरेदी केंद्र अचानक बंद केली आहेत. त्यामुळं तेथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. गेल्या 8 दिवसांपासून शेतकरी खरेदी केंद्राबाहेर उभे आहेत. 5 हजार 500 शेतकरी खरेदी सुरु होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
 
शेतकऱ्यांच्या समोरील अडचणी काही कमी होत नाहीत. मागच्या 8 दिवसांपासून नाफेडने परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील 17 शासकीय हमीभाव हरभरा खरेदी केंद्र अचानक बंद केली आहेत. महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना हरभरा खरेदी करण्यासाठी घेऊन येण्याचे मॅसेज करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी केंद्रावर आणल्यानंतर ही खरेदी केंद्रे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळं मागच्या 20 मे पासून हजारो शेतकरी या खरेदी केंद्रांबाहेर वाहनांमध्ये आपला हरभरा घेऊन उभे आहेत. जस जसे दिवस वाढताहेत तसं तसं या गाड्यांचे भाडे वाढत असल्याने आमच्या हाथी काय लागणार? असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे. एकीकडे खरीप हंगाम सुरु होतोय तर दुसरीकडे हे शेतकरी हरभरा विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. 

मुदतीआधीच खरेदी केंद्र बंद

हमीभावाने हरभरा खरेदी करण्यासाठी हमीभाव केंद्राला 29 मे पर्यंतची मुदत आहे. मात्र, उद्दिष्ट पूर्ण झाल्यानं नाफेड आणि एफसीआय या एजन्सीच्या माध्यमातून नाफेड हमीभाव खरेदी केंद्रात खरेदी केल्या जाणाऱ्या हरभऱ्याची खरेदी अचानकपणे 23 मे रोजी थांबवली आहे. हरभरा खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण झाल्याचं कारण पुढे करुन दिलेल्या मुदतीपूर्वीच नाफेडने हरभरा खरेदी बंद केली आहे. हरभरा उत्पादक शेतकरी सरकारच्या या कृतीमुळे हवालदिल झाले आहेत. राज्यभर खरेदी केंद्रांवर हजारो वाहने उभी असताना अचानक खरेदी बंद केल्याचे सांगण्यात आल्याने शेतकऱ्यांची प्रचंड कोंडी झाली आहे. वाहनांचे भाडे दररोज वाढत असून नाईटचार्ज भरावा लागत असल्याने व खरेदी होईल याची शाश्वती नसल्याने शेतकरी काकुळतीला आल्याचे दिसत आहे. राज्यात नाफेडद्वारे 5 हजार 230 रुपये प्रति क्विंटल दराने हरभरा खरेदीची प्रक्रिया सुरु होती. खुल्या बाजारात 4 हजार 200 रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेडला हरभरा विकण्याचा पर्याय निवडला होता. मात्र, अचानक खरेदी बंद केल्यानं शेतकरी अडचणीत सापडला आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here