यावेळी संजय राऊत यांनी संभाजीराजेंच्या उमेदवारीवरुन शिवसेनेला लक्ष्य करणाऱ्या विरोधकांना चांगलेच फटकारले. छत्रपतींच्या गादीविषयी आम्हाला पहिल्यापासून आदर होता आणि आजही आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले. हा विषय छत्रपती संभाजीराजे आणि शिवसेनेतला आहे. इतरांनी त्यामध्ये चोमडेपणा करु नये. भाजपला इतकेच वाटत होते तर त्यांनी संभाजीराजे यांना ४२ मतं द्यायला पाहिजे होती, असे संजय राऊत यांनी म्हटले.
राज्यसभेची उमेदवारी देताना शिवसैनिकच निवडून जाणार, हे आम्ही ठरवले होते. त्यासाठी पहिल्यापासूनच सामान्य शिवसैनिकांच्या नावांचा आम्ही विचार करत होतो. यामध्ये संजय पवार आणि नंदूरबारच्या पारवे यांचा समावेश होता. पारवे हे देखील एकांड्या शिलेदाराप्रमाणे नंदूरबारमध्ये लढत आहेत. अशा शिलेंदारांना विधिमंडळात किंवा संसदेत पाठवायला हवे, ही उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. याच भूमिकेतून आम्ही संजय पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याचे राऊत यांनी सांगितले.
शिवेंद्रसिंह राजे काय म्हणाले?
छत्रपती संभाजीराजेंना राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याआधीच माघार घ्यावी लागली. मला तर वाटतंय त्यांचा गेम झाला. त्यांचा गेम कुणी केला, हे संभाजीराजेंना चांगलंच माहिती आहे. छत्रपती घराण्यातील वंशजाचा महाविकास आघाडीने सन्मान राखायला हवा होता, असे वक्तव्य शिवेंद्रराजे भोसले यांनी केले होते.
मुख्यमंत्र्यांच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं चुकीचं: राऊत
संभाजीराजे छत्रपती यांनी कालच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दिलेला शब्द मोडल्याचे म्हटले होते. त्यामुळे आपल्याला दु:ख झाले, असेही संभाजीराजे यांनी म्हटले. यावर संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली. मुख्यमंत्र्यांच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे चुकीचे आहे. ही जागा शिवसेनेची आहे. तिथे आमचाच उमेदवार असेल हे ठरलं होतं. मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजे यांना इतकंच सांगितलं होतं की, पुरस्कृत उमेदवारीच्या मुद्द्याबाबत मला माझ्या सहकाऱ्यांशी बोलावे लागेल. राज्यसभेवर कोणते उमेदवार पाठवायचे हा आमच्या पक्षाचा विषय आहे. तो निर्णय आम्हीच घेणार, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.