मध्यंतरीच्या वर्षांत अनेक ऐतिहासिक मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस आले; पण त्यात काहीसा एकसुरीपणा होता. लिखित-दिग्दर्शित ‘सरसेनापती हंबीरराव’ हा त्याला छेद देतो. निर्मितीमूल्याची भव्यता सिनेमात आहेच; शिवाय प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवणारं लिखाण आणि सादरीकरण प्रवीणनं केलं आहे. सिनेमात एक प्रकारचा ठेहराव आहे, जो आपल्याला सिनेमाची गोष्ट आणि पटकथा समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ देतो. मात्र, त्यामुळेच ती काही प्रेक्षकांना संथ आणि कंटाळवाणीही वाटू शकते. उत्तम लेखन आणि तितकंच समर्पक दिग्दर्शन आणि अभिनय अशी तिहेरी कामगिरी करताना प्रवीणनं सिनेमाची छान गुंफण केली आहे. कथानकाची पार्श्वभूमी, सुरुवात, मध्य आणि शेवट हे अचूक जुळून आलं आहे. स्वराज्याचे कर्तबगार सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची गोष्ट सांगताना त्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कालखंडातल्या इतर शुरांच्या अतुलनीय शौर्यगाथेलाही सिनेमानं स्पर्श केला आहे.

महाराजांचे लढवय्ये सेनानी हंसाजी मोहिते यांचा सरसेनापती हंबीरराव मोहिते होण्याचा प्रवास आणि त्यांच्या शौर्याचा कळसही सिनेमात आपल्याला पाहायला मिळतो. इसवी सन १६७४ पर्यंत महाराजांच्या लढवय्या मावळ्यांचे सरनोबत होते प्रतापराव गुजर. शिवराज्याभिषेकापूर्वी काही महिने, महाराज पन्हाळगडावर मुक्कामी होते. याच काळात सरदार बहलोलखान २० हजार सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून आला. महाराजांची आज्ञा होती, की बहलोल खानाला ठार मारावे. प्रतापराव आणि त्यांच्या सैन्यानं बहलोलखानाला पराभूत केलं; पण शेवटी प्रतापरावांकडे गयावया करीत खानानं अभयदान मागितलं. प्रतापरावांनीही मोठ्या मनानं अभयदान दिले. ही बातमी महाराजांना कळल्यावर महाराज चिडले आणि प्रतापरावांना खरमरीत पत्र लिहून जाब विचारला. ‘हा बहलोल वरचेवरी येतो. यांसी गर्दीस मेळवून फत्ते करणे. अन्यथा आम्हांस तोंड न दाखवणे,’ असं महाराज लिहितात. पुन्हा एकदा प्रतापराव आपल्या सहा शिलेदारांसह खानावर चालून गेले. ‘वीर दौडले सात…’ची हीच पार्श्वभूमी सांगत सिनेमाचा प्रारंभ होतो. या लढाईत सात वीर धारातीर्थी पडले. स्वराज्यानं आपले सरनौबत गमावले. शिवराज्याभिषेक जवळ असताना स्वराज्याचा सरसेनापती कोण? आणि का, याचं उत्तर हा सिनेमा देतो.

राज्याभिषेकानंतरचा पहिला सरसेनापती नियुक्त करतानाच्या अपेक्षांचं दीर्घ वर्णन करताना मराठ्यांच्या शौर्याचा पाढा प्रभावीपणे वाचलेला आहे. ज्यातून बाजी पासलकर, कान्होजी जेधे, नेताजी पालकर, तान्हाजी मालुसरे, मानकोजी दहातोंडे, बाजीप्रभू देशपांडे अशी शौर्याची सगळी परंपरा समोर येते. लिखाण आणि दिग्दर्शनाच्या पातळीवर प्रवीण तरडे यांनी कुशल काम केलं आहे. लेखक-दिग्दर्शक स्वतःच मुख्य भूमिका साकारतोय म्हटल्यावर त्याला स्वतःला ती नीट उमजायलाच हवी. अनेक प्रसंगांमध्ये तशी ती उमजल्याचं दिसतं, तर काही प्रसंगांमध्ये मात्र क्वचित ती निसटतेही. सिनेमॅटोग्राफर महेश लिमये यांचं काम अप्रतिम आहे. युद्ध, घोडेस्वारी, समुद्रातेल प्रसंग याचं चित्रण सुबक झालं आहे. नैसर्गिक उजेडाचा अचूक वापर अनेक प्रसंगांमध्ये दिसतो.

गश्मीर महाजनीनं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही व्यक्तिरेखा लीलया साकारल्या आहेत. अनाजीपंतांच्या भूमिकेत , लक्ष्मीबाई मोहिते यांच्या भूमिकेत स्नेहल तरडे, महाराणी सोयराबाईंच्या भूमिकेत आणि बहिर्जी नाईक यांच्या भूमिकेत यांनी आपल्या अभिनयकुशलतेचं दर्शन घडवलं आहे. सिनेमाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे, सिनेमाचे पार्श्वसंगीत आणि गाणी. गाण्यांमधून सिनेमाची गोष्ट पुढं जाते. सिनेमा रंजक असला, तरी काही ठिकाणी मात्र तो रटाळही होतो. कदाचित संकलनाची कात्री तोकडी पडली असावी. सिनेमातले व्हीएफएक्स अपेक्षित प्रभाव पाडत नाहीत, तरीही एकंदर ही शौर्यगाथा प्रभावी असून ती बघावी अशीच आहे.

सरसेनापती हंबीरराव

निर्मिती ः ऊर्विता प्रॉडक्शन्स

कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन ः प्रवीण तरडे

कलाकार ः प्रवीण तरडे, उपेंद्र लिमये, , , श्रुती मराठे, सुनील अभ्यंकर

छायाचित्रण ः महेश लिमये

संकलन ः मयूर हरदास

संगीत ः नरेंद्र भिडे

दर्जा ः तीन स्टार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here