प्रेयसीसोबतच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या मित्रावर हल्ला; नाशिकमध्ये १३ दिवसांतील सहावा खून – a youth was stabbed to death at bharatnagar mumbai naka in nashik city
सौरभ बेंडाळे | नाशिक : शहरात किरकोळ वादातून आणखी एका तरुणाची हत्या झाली आहे. मुंबई नाका पोलिसांच्या हद्दीत भारतनगर येथे मध्यरात्री तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. सागर प्रकाश रावतर (२०) असे मयत तरुणाचे नाव आहे. नाशिकमध्ये मागील १३ दिवसांत झालेला हा सहावा खून आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी भोये याचे कोरडे नामक मुलीसोबत प्रेमसंबंध होते. सागर रावतर हा नेहमी त्यांच्या भांडणात मध्यस्थी करायचा. या कारणातूनच सागरवर शनिवारी मध्यरात्री भारत नगर येथे हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी संशयित भरत भोये, गौतम भोये आणि गणेश भोये यांना मुंबई नाका पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, हत्येच्या घटनेनंतर विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे सुट्टीवर असल्याने बी. जी. शेखर हे घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी पोलिसांकडून आता अधिक तपास केला जात आहे.
नाशिक शहरात गुन्हेगारांचा धुमाकूळ
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात गुन्ह्यांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. शहरात गुंडगिरी, टोळक्यांच्या वादातून जीवघेणे हल्ले अशा घटना वाढल्या आहेत. वारंवार होणाऱ्या हत्यांमुळे शहरात कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.