आता KGF प्रमाणेच बिहारमधल्या जमुई जिल्ह्यातून सोनं काढण्याची तयारी सुरू झाली आहे. ही भारतामधील सर्वात मोठी सोन्याची खाण असेल. या खाणीतून सोनं बाहेर काढण्याचं काम राज्य सरकार करणार आहे. खाणकाम करण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या बिहार सरकारनं दिल्या आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं याबद्दलची माहिती शनिवारी दिली.
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार, जमुई जिल्ह्यात २२२.८८ मिलियन टन सोन्याचं भांडार आहे. जमुईच्या जमिनीतून सोनं काढण्यासाठी खाण आणि भूवैज्ञानिक विभाग आणि राष्ट्रीय खनिज विकास निगमसह आणखी काही संस्था संयुक्तपणे काम करणार आहेत.
जीएसआयला मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करण्यात आलं आहे. जमुई जिल्ह्यातील करमाटिया, झाझा आणि सोनो या भागांमध्ये सोनं असल्याची माहिती मिळाली आहे, असं अतिरिक्त मुख्य सचिव आणि खाण आयुक्त हरज्योत कौर बम्हरा यांनी दिली. पुढील महिन्याभरात प्राथमिक राज्य सरकार सोन्याचा प्राथमिक शोध सुरू करेल. त्यासाठी एका केंद्रीय संस्थेशी आणि अन्य संस्थांशी सामंजस्य करार केले जातील. काही क्षेत्रांमध्ये सामान्य स्तरावरही शोध घेतला जाऊ शकतो, असंही बम्हरा म्हणाल्या.
बिहारमध्ये सर्वाधिक सोन्याच्या खाणी असल्याची माहिती केंद्रीय खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गेल्या वर्षी लोकसभेत दिली होती. बिहारमध्ये २२२.८८५ मिलियन टन सोनं आहे. देशातील एकूण सोनं भांडाराच्या तुलनेत बिहारकडे असलेल्या सोन्याचं प्रमाण ४४ टक्के आहे, अशी माहिती त्यांनी लेखी स्वरुपात दिली होती.