नेमकं काय घडलं?
एदवा बशीर हे दीर्घ काळापासून ब्ल्यू डायमंड ऑर्केस्ट्रामध्ये गाणी सादर करत होते. शनिवारी केरळातील कोलम जिल्ह्यातील पाथिरापल्लीमध्ये ऑर्केस्ट्राचा शो होता. यावेळी ‘माना हो तुम बेहद हसीन’ हे हिंदी गाणं सादर करत असतानाच ते अचानक व्यासपीठावर कोसळले. त्यांना लगेचच एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
संगीत विश्वातील मोठं नाव
शालेय जीवनापासूनच एदवा बशीर यांनी मल्ल्याळम संगीत विश्वात नाव कमावलं होतं. त्यांनी अनेक पुरस्कारही पटकावले आहेत. संगीतालय नावाचा म्युझिक ग्रुप सुरु केल्यानंतर ते प्रकाशझोतात आले. दुर्गामातेवर आधारित अकसरुपिनी अन्नपूर्णेश्वरी या गाण्यासाठी रसिकांनी त्यांना डोक्यावर घेतले. अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांना हे गाणं सादर करण्याची मागणी चाहते करत. जगभरात प्रवास करत अमेरिका, यूके, युरोप, मध्य पूर्व देशांपर्यंत त्यांनी आपला आवाज पोहोचवला होता.
दिग्गजांकडून श्रद्धांजली
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन यांनी एदवा बशीर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. सुप्रसिद्ध पार्श्वगायिका के एस चित्रा यांनीही ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहिली आहे.