ठाणे: ठाण्यातील रहिवाशी असलेल्या पुनमिया कुटुंबातील ४ चार जणांचा आणि एक अन्य असा एकूण पाच जणांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना सिक्कीम येथे घडली आहे. पुनमिया परिवाराची कार दरीत कोसळून शनिवारी संध्याकाळी अपघात झाला आणि त्यातच या ५ जणांना मृत्यू झाला. तर दुसरीकडे नेपाळ येथे झालेल्या विमान दुर्घटनेत ठाण्यातील माजिवडा परिसरातील रुस्तमजी या उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणाऱ्या त्रिपाठी कुटुंबातील चार जण बेपत्ता झाले. त्रिपाठी कुटुंब नेपाळ येथे पर्यटनासाठी गेले असताना ही दुर्घटना झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दोन्ही घटनांमुळे ठाण्यात हळहळ व्यक्त होत आहे.
ठाण्यातील टेंभीनाका परिसरातील ओशो महावीर इमारतीतील जैन समाजातील पुनमिया कुटुंब हे सिक्कीमला पर्यटनासाठी गेले होते. शनिवारी संध्याकाळी इच्छितस्थळी पोहोचण्यापूर्वीच या कुटुंबावर काळाने घाला घातला. ते प्रवास करीत असलेल्या कारला अपघात झाला. पुनमिया यांची गाडी खोल दरीत कोसळली. या अपघातात सुरेश पुनमिया, त्यांची पत्नी तोरण पुनमिया, १४ वर्षाची मुलगी हिरल पुनमिया, १० वर्षीय मुलगी देवांशी पुनमिया या एकाच कुटुंबातील चार जणांचा आणि अन्य एक जन अमित परमार असा एकूण ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
सिक्कीम येथे जाते वेळी त्यांच्यासोबत आणखी एक कारदेखील होती. अमित परमार हा दुसऱ्या गाडीत बसला होता. मात्र कार थांबल्यानंतर अमित हा पुनमिया असलेल्या कारमध्ये बसला. त्यानंतर थोड्याच वेळात कारला अपघात झाला. सुरेश पुनमिया हे जैन धर्मीय असून धार्मिक होते. या पाचही ठाणेकरांचे मृतदेह सोमवारी ठाण्यात येणार असून मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती जैन समाजाचे सामाजिक कार्यकर्ते आणि व्यापारी नरेंद्र जैन यांनी दिली आहे.
तर दुसरीकडे नेपाळ येथे फिरण्यासाठी गेलेल्या ठाण्यातील त्रिपाठी कुटुंबावरदेखील संकट कोसळलं. त्रिपाठी कुटुंब नेपाळ येथे ज्या विमानाने प्रवास करत होते, ते विमान बेपत्ता झाल आहे. या विमानात ठाण्यातील उच्चभ्रू सोसायटी रुस्तमजी एथिना या इमारतीत रहाणारे एकाच कुटुंबातील चार जन प्रवास करत होते आणि ते अद्याप बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. या त्रिपाठी कुटुंबात ५४ वर्षीय अशोक त्रिपाठी, त्यांची ५१ वर्षीय पत्नी वैभवी बांदेकर-त्रिपाठी, २२ वर्षीय मुलगा धान्यस्य त्रिपाठी आणि १८ वर्षीय मुलगी ऋतिका त्रिपाठी या चार सदस्यांचा समावेश आहे. हे सगळे नेपाळ येथे पर्यटनासाठी गेले असल्याची माहिती समोर आली आहे. नेपाळच्या पोखरा येथून त्यांनी अन्य ठिकाणी जाण्यासाठी विमान पकडले. त्यामुळे दुर्घटनेत या चार ठाणेकरांसह विमानाच बेपत्ता असल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांकडून प्राप्त झाली.