कोल्हापूर : राज्यसभेसाठी भाजपने धनंजय महाडिक यांना पक्षाचा तिसरा उमेदवार घोषित करून पुन्हा एकदा विजयासाठी संघर्ष करण्याची वेळ त्यांच्यावर आणली आहे. राजकारणात प्रवेश केल्यापासून कोणताही विजय सहजासहजी न मिळाल्याने त्याच इतिहासाची पुनरावृत्ती महाडिक यांच्याबाबत होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जून रोजी मतदान होत आहे. यातील पाच जागांपैकी तीन जागांवर महाविकास आघाडी तर दोन जागांवर विजय मिळवण्यासाठी भाजपकडे पुरेसे संख्याबळ आहे. त्यामुळे या उमेदवारांना फारशी काळजी नाही. मात्र सहाव्या जागेसाठी निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेने कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार या सामान्य कार्यकर्त्याला संधी देत राजकारणात भावनिक षटकार मारला आहे. संजय पवार यांना महाविकास आघाडीची साथ आहे. सेनेच्या हक्काच्या मतांबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादीची शिल्लक मतांची मदत त्यांना मिळणार आहे. यामुळे त्यांची बाजू सध्यातरी भक्कम आहे.

‘रोहित पवार शिवसेनेचे कार्यकर्ते फोडतात, वेळ पडल्यास शरद पवारांकडे तक्रार करेन’

भाजपने पवार यांच्याविरोधात माजी खासदार आणि पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांना एक आणि दोन नंबरची उमेदवारी देऊन त्यांचा विजय पक्षाने सुकर केला. दुसऱ्या नंबरसाठी महाडिक यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती. तसे झाले असते तर त्यांचा विजय सोपा झाला असता. मात्र, तिसऱ्या जागेची उमेदवारी देऊन त्यांच्यावर पुन्हा एकदा संघर्ष करण्याची वेळ भाजपने आणली आहे.

धनंजय महाडिक आणि राजकीय संघर्ष

राजकारणात प्रवेश केल्यापासून महाडिक यांना संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळाले नाही. पहिलीच निवडणूक त्यांनी लोकसभेची लढवली. सदाशिवराव मंडलिक यांच्याविरोधात लढवलेल्या या निवडणुकीत त्यांचा १४ हजार मतांनी पराभव झाला. मात्र एका युवकाने राजकारणातील दिग्गज नेत्याला दिलेली टक्कर हा तेव्हा चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. सध्याचे पालकमंत्री सतेज पाटील आणि त्यांच्यात झालेली ही निवडणूक राज्यात चुरशीची ठरली होती. अटीतटीच्या या निवडणुकीत महाडिक यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. पण उमेदवारी मिळवताना त्यांना संघर्ष करावा लागला. ऐनवेळी पक्षाने उमेदवारीची माळ संभाजीराजे यांच्या गळ्यात घातल्यामुळे त्यांचा संघर्ष उमेदवारीच्या पातळीवरच संपला. त्यानंतर २०१४ साली राष्ट्रवादीने महाडिक यांना लोकसभेची उमेदवारी दिली. देशात तेव्हा भाजपची मोदी लाट होती. या लाटेत महाडिक यांना विजयासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. या संघर्षात ते यशस्वी झाले आणि खासदार झाले. पाच वर्षात त्यांनी आपल्या कामाचा चांगला ठसा उमटवला. मात्र २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीची उमेदवारी मिळूनही मित्रपक्षांची साथ न मिळाल्याने त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला.

या सर्व पार्श्वभूमीवर महाडिक आता राज्यसभेच्या निवडणुकीत उतरले आहेत. येथेही त्यांना पुन्हा एकदा संघर्षाला सामोरे जावे लागत आहे. भाजपने पहिल्या अथवा दुसऱ्या क्रमांकाची उमेदवारी न देता तिसऱ्या क्रमांकाची उमेदवारी दिल्याने त्यांना आता महाविकास आघाडीच्या संजय पवार यांच्याशी टक्कर द्यावी लागणार आहे. कुस्ती कोल्हापुरातील दोन पैलवानांमध्ये रंगणार आहे. यामध्ये आता अपक्षांना मोठा भाव येणार आहे. सध्यातरी महाविकास आघाडीचे पारडे जड असले तरी अपक्षांच्या मतावरच निकाल अवलंबून राहणार आहे. यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार रंगणार हे नक्की आहे. विजयासाठी आता महाडिक यांच्यासह पवार यांनाही संघर्ष करावा लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here