तेव्हा पंकज यांना तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पंकजा मुंडे यांनी म्हटले की, अजिबात नाही. सध्या जे चालू आहे ते पाहता मी आहे तिथेच बरी आहे, असे पंकजा यांनी म्हटले.
यापूर्वी पंकजा मुंडे यांचे, ‘मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे’, हे वक्तव्य चांगलेच गाजले होते. त्यानंतर भाजपमधील राजकीय समीकरणे वेगाने बदलली होती. मात्र, यावेळी पंकजा मुंडे यांनी विधानपरिषद निवडणुकीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीसांचा सूर सकारात्मक दिसत आहे. पंकजा मुंडे आमच्या मोठ्या नेत्या आहेत. आमच्याकडून त्यांच्या नावाला पूर्ण पाठिंबा आहे. अशा काही निवडणुका होतात, तेव्हा त्यांचं नाव चर्चेत येतं. ते साहजिकच आहे. त्यांचं नाव चर्चेत येणं यात काहीच वावगं नाही. त्या कोणत्याही पदासाठी पात्र आहेत. आमच्या त्यांच्या नावाला पाठिंबा आहे. आम्ही पूर्णपणे सकारात्मक आहोत. याबद्दलचा निर्णय आमचे हायकमांड घेतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.
पंकजा मुंडेंना विधानपरिषदेसाठी संधी मिळणार?
येत्या २० जून रोजी विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होत आहे. विधानससभेतील संख्याबळानुसार भाजपचे ४, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी २, काँग्रेसचा एक आणि १० व्या जागेसाठी पुन्हा भाजप आणि मविआमध्ये चुरस होऊ शकते. यावेळी भाजपकडून पंकजा मुंडे यांना संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पंकजा मुंडेही यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले जाते.