यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आम्हाला घोडेबाजार करायचा नाही. भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, याची आम्हाला खात्री आहे. तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही उमेदवार मागे घ्या, म्हणजे घोडेबाजार होणार नाही. आमचे तिन्ही उमेदवार महाराष्ट्रातील आहेत आणि राजकीयदृष्ट्या सक्रिय आहेत. राज्यातील सत्ताधारी पक्षाचे अनेक आमदार सद्सद्विवेकबुद्धी आम्हाला मतदान करतील. त्यामुळे आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
यावेळी प्रसारमाध्यमांनी फडणवीस यांना, तुम्ही धनंजय महाडिक यांना कसे निवडून आणणार, असा प्रश्न विचारला. त्यावर फडणवीस यांनी म्हटले की, आम्ही राज्यसभा निवडणुकीत तिसरा उमेदवार उतरवाय, म्हणजे आम्ही काहीतरी विचार केला असेल. तिसरा उमेदवार कसा निवडून आणणार, याबाबत आम्ही स्ट्रॅटेजी ठरवली आहे. पण त्याबद्दल मीडियात चर्चा करायची नसते, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. त्यामुळे आता १० जून रोजी प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी अनपेक्षित निकाल पाहायला मिळणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या १० जून रोजी निवडणूक होत आहे. सध्याच्या संख्याबळानुसार दोन जागांवर भाजप आणि प्रत्येकी एका जागेवर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल. मात्र, सहावी जागा जिंकण्यासाठी कोणत्याही एका पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे या जागेवरून चुरस निर्माण झाली आहे.