तेजश्री प्रधान, अभिनेत्री

रत्नागिरीमधील कातळवाडी येथील फुणगूस गावात एक आनंदाचं शेत आहे. आनंदाचं शेत हे रिसॉर्ट मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध जोडपं संपदा जोगळेकर-कुलकर्णी आणि राहुल कुलकर्णी यांचं आहे. या आनंदाच्या शेतात गावकऱ्यांचं जीवन आम्हाला अनुभवता आलं. गावाकडच्या घरांचा अनुभव आणि आधुनिक सुखसोयी असं हट के समीकरण इथे आहे. राहण्या-खाण्याची उत्तम सोय आहे. अंगणातील शेतात पिकवलेल्या भाज्या शिजवून पानात वाढल्या जातात. या ताज्या भाज्यांची चव प्रत्येकानं एकदा तरी चाखायलाच हवी.

मी, माझी बहीण आणि तिचा नवरा असे आम्ही कुटुंबीय रोड ट्रीप करत तिथं पोहोचलो. मुंबईहून साधारण नऊ तासांच्या अंतरावर हे ठिकाण आहे. इथल्या सफरींमध्ये शेतात लावलेल्या विविध भाज्या-फळांची ओळख करून देतात. विशेष म्हणजे इथल्या पाळीव प्राण्यांशी आपली पटकन मैत्री होते. मधमाश्यांच्या पोळ्यातील मधाची मधुर चव चाखता आली. लहानपणी चिंचा-बोरांच्या गाडीवर मिळणारी चांदणीच्या आकारातली करमलं इथे खायला मिळाली. झाडाला लागलेली करमलं स्वतःच्या हाताने तोडून खाणं हा एक हवाहवासा अनुभव होता. शहरातल्या मंडळींसाठी झाडावरची फळं तोडून खाण्याचं सुख दुर्मिळ आहे. अगदी निसर्गाच्या कुशीत शिरण्याचा अनुभव इथे घेता येतो.

आम्ही प्रवासादरम्यान धमाल-मस्ती केली. निसर्गाला आपण किती गृहीत धरलं आहे, ही जाणीवही झाली. साधं उदाहरण घेऊ या. हल्ली शहरातली बहुतेक मंडळी वातानुकूलित गाड्यांमधून प्रवास करतात. पण तरीही गाडी चालवताना थोडासा ब्रेक घ्यावासा वाटला तर पटकन म्हटलं जातं, ‘अरे, त्या झाडाच्या सावलीत गाडी थांबवू या’. सावली देणाऱ्या या आपल्या वृक्ष मित्रांसाठी आपण काय करतो? झाडं लावणं, झाडांची निगा राखणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या आयुष्यातील अनेक दिवस आपण साजरे करतो. हे महत्त्वाचे दिवस आपण आपल्या कुटुंबीय-मित्रमंडळींना घेऊन झाडांबरोबर साजरे केले तर?
अभिनेत्री ते शेतकरी…संपदा जोगळेकर-कुळकर्णी
निसर्गाने आपल्याला भरभरून दिलं आहे. आपण निसर्गाला जपायला हवं. झाडं जगवणं ही आपली जबाबदारी आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या जमिनी जिवंत ठेवणं महत्त्वाचं आहे. शेत नांगरून, शेताची निगा राखून, योग्य प्रकारे पिकांची लागवड करून जमिनीचं पालनपोषण करायला हवं. पूर्वी एक संत्र खाल्ल्यावर माणसाला जितकी प्रथिनं मिळायची तितक्या प्रमाणात प्रथिनं मिळवण्यासाठी आजच्या घडीला आठ संत्री खावी लागत आहेत. आपल्या जमिनींचं अनारोग्य हे यामागचं प्रमुख कारण आहे. संशोधनाने पुढील ३०-४० वर्षांत जमिनीची सुपिकता पूर्णपणे नष्ट होण्याची शक्यता वर्तवली आहे. भविष्यात पोषक आहार मिळवण्यासाठी आजपासून जमिनीचं आरोग्य जपायला सुरुवात करू या. आपआपल्यापरीने निसर्गाची मनापासून काळजी घेऊ या. प्राणवायूपासून प्रत्येक गोष्टीसाठी आपण निसर्गावर अवलंबून आहोत, याचं भान राखलं पाहिजे. माणसाने विज्ञान-तंत्रज्ञानात कितीही प्रगती केली तरीही मातीशी त्याचं नातं घट्ट असणं गरजेचं आहे. आपल्या मातीशी असलेलं आपलं नातं आणखी दृढ करण्यासाठी प्रयत्नपूर्वक पावलं उचलू या.

शब्दांकन- गौरी आंबेडकर, एसएनडीटी विद्यापीठ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here