केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षा २०२१ चा अंतिम निकाल सोमवारी जाहीर झाला. यंदा परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनीही परीक्षेत यश मिळवित पुन्हा आपली गुणवत्ता सिद्ध केली.
यूपीएससीचं वडिलांचं स्वप्न अधुरं
औरंगाबादच्या शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी मानसी नरेंद्र सोनवणे हिने परीक्षेत यश मिळवले. पडेगाव येथील रहिवासी असलेले मानसीचे वडिल लेखाधिकारी आहेत तर आईही शसकीय सेवेत आहे. घरची परिस्थिती, माहितीचा अभाव यामुळे नरेंद्र यांना यूपीएससीत यश मिळवता आले नाही. त्यांनी आपले हे स्वप्न कन्या मानसीला बोलून दाखवले. आपल्या वडिलांचे राहिलेलं स्वप्न आपण पूर्ण करू असा विश्वास अन् ध्येय ठेवले.
हेही वाचा : शेतकऱ्याच्या लेकीचा UPSC परीक्षेत डंका, पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण, आईबापाच्या कष्टाचं पांग फेडलं
त्या दृष्टीने तिने अभ्यास, परिश्रम घेणे सुरू केले. बारावीनंतर शासकीय ज्ञान महाविद्यालयात कला शाखेतून प्रवेश घेतला. नागरी सेवा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. वडिलांनी दाखविलेल्या मार्गावर चालताना तिने नियमित अभ्यासावर भर दिला. राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र यासह आंतरराष्ट्रीय संबंध विषयावर लक्ष दिले. अभ्यासातील सातत्य, विषयांचे सखोल ज्ञान, शिक्षकांचे मार्गदर्शन यावर भर देत तिने ध्येय गाठण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली.
नियमित अभ्यासावर भर
२०२१ च्या अंतिम परीक्षेचा निकाल आला अन् तिने यश मिळवित स्वप्न पूर्ण केले. मानसी आपल्या यशाबद्दल सांगते, नियमित सात तास अभ्यास केला. राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध विषयावर अधिक लक्ष दिले. मुलाखतीत याच दोन विषयावर अधिक प्रश्न विचारले गेले. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचा यूपीएससीकडे कल याबाबत ती म्हणाली, आपल्या भागातील विद्यार्थ्यांचा कल अधिक एमपीएससीकडे आहे.
विद्यार्थ्यांमध्ये क्षमता असते परंतु भाषेचा न्यूनगंड अनेकदा जाणवला. मला भाषेबाबत कोणती अडचण नव्हती परंतु इतरांशी संवाद साधताना याबाबी लक्षात आल्या. हा न्यूनगंड आपण दूर केला पाहिजे. तो दूर झाला तर यूपीएससीमध्येही अधिकाधिक आपले विद्यार्थी असतील असा तिने विश्वास व्यक्त केला.
पुणे सोडलं, गावात राहून अभ्यास केला; तरी साताऱ्याच्या ओंकारने यूपीएससीत घवघवीत यश मिळवलं