नागपूरः नागपूरातील नागेश्वरनगर परिसरात कापसी बिडगाव मार्गावर सोमवारी सकाळी चारच्या सुमारास दोन सॉ मिलमध्ये आग लागली. दोन्ही लाकडाच्या सॉ मिल असल्याच्या कारणाने आगीने लगेच रौद्र रुप धारण केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे सहा फायर टेंडर घटनास्थळी पोहोचले आणि दोन तासांच्या परीश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश आले.उद्याप आग लागण्याचे कारण समोर आले नाही.

अलिकडच्या काळात शहरात आगीच्या घटना वाढल्या आहे. यातच सोमवारी सकाळी चारच्या सुमारास नागेश्वरनगर, कापसी बिडगाव मार्गावरील खेतानी एंटरप्राइज आणि हिराधन टिंबर येथे आग लागली. घटनेची माहिती आपातकालीन कक्षाला मिळताच कळमना, लकडगंज, सुगतनगर, गंजीपेठ, सक्करदरा, कॉटन मार्केट येथील अग्निशमन केंद्रातील सहा फायरटेंडर घटनास्थळी रवाना झाले असल्याचे मुख्य अग्नीशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी कळवले. या आगीत लाकडांसह लाकडून तोडण्याचे यंत्र आणि शेजारील दोन दुकानेही आगीत भस्मसात झाली.दरम्यान सॉ मिलमध्ये आग लागण्याची ही पहिलीच घटना नसून यापूर्वीही दुकान, गोडाऊन आदी ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत.

70 झोपड्यांची राख

मे महिन्याच्या सुरुवातीलाच बेलतरोडी परिसरातील महाकालीनगरातील झोपडपट्टीला आग लागली होती. सिलिंडरच्या स्फोटामुळे परिसरातील सुमारे 70 झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. या आगीत जवळपास 20 सिलिंडरचा स्फोट झाला होता. विशेष म्हणजे ही झोपडपट्टी बेलतरोडी पोलिस स्थानकाच्या मागील भागात वनविभागाच्या जागेवर होती.याची सुरुवात एका झोपडीत सिलिंडरच्या स्फोट झाल्यापासून झाली होती आणि पाहता पाहता पूर्ण झोपडपट्टी यामध्ये जळाली.

चालती’आपली बस’ पेटली

नागपूर महानगरपालिकेच्या चालत्या ‘आपली बस’ला देखील या उन्हाळ्यात आग लागली होती. संविधान चौकात लागलेल्या आगीत तर चालकाला तर अवघ्या काही क्षणातच बस रिकामी करावी लागली होती. यात थोडक्यात 45 प्रवाश्यांचा जीव वाचला होता. या घटनांमध्ये चालक आणि प्रवाश्यांच्या सतर्कतेमुळे सर्वांना सुखरुप उतरविण्यात आले होते. मात्र दरवर्षी आपली बसला आग लागण्याच्या घटना घडत असल्याने प्रवाशांचा सुरक्षिततेबाबत मनपाची गांभीर्यता दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here