नेमकं का पुकारलं आंदोलन?
पेट्रोल, डिझेल, सीएनजी पंप मालकांना इंधन विक्री कंपनीकडून कमिशन दिले जाते. सध्या पेट्रोल व डिझेलसाठीचे कमिशन २.६० रुपये तर ३.२० रुपयांदरम्यान आहे. पण वाढत्या खर्चाला अनुसरून यात वाढ व्हावी, अशी पंपांच्या मालकांची मागणी आहे. त्यासाठीच पंप मालकांनी मंगळवारी खरेदी बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत ते कंपनीकडून इंधन खरेदी करणार नाहीत. याबाबत ‘फामपेडा’शी संलग्न असलेल्या मुंबई पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे सल्लागार रवी शिंदे यांनी माहिती दिली आहे.
‘इंधन विक्री कंपन्यांनी अलीकडेच एलपीजी गॅस सिलिंडर डीलर्सचे कमिशन वाढवले. सीएनजीच्या वाढत्या दरांसह त्या वितरकांचे कमिशनदेखील वाढले आहे. पण पेट्रोल व डिझेल पंप मालकांचे कमिशन पाच वर्षांत वाढविण्यात आलेले नाही. या पाच वर्षांत कर्मचाऱ्यांचे पगार, वीज वापर खर्च, महागाई आदी सर्वच मोठ्या प्रमाणात वाढले आहे. खर्च वाढेल त्यानुसार कमिशन वाढवले जावे, असे पेट्रोलियम मंत्रालयाचे सूत्र आहे. त्यामुळेच या मागणीसाठी आम्ही हे आंदोलन करीत आहोत,’ असं रवी शिंदे यांनी सांगितलं आहे.