विशेष म्हणजे या निवडणुकीत मतांची बेगमी करण्यासाठी अरूण निटुरे यांनी आमदारांना जाहीरपणे आमिष दाखवायला सुरुवात केली आहे. राज्यसभा निवडणुकीत आमदारांनी सहकार्य केल्यास त्यांना प्रत्येकी एक टाटा सफारी गाडी भेट म्हणून देऊ. हे कोणतेही आमिष नसून मतदारसंघात त्यांना काम करता यावं यासाठी भेट असणार आहे, अशी घोषणा अरुण निटुरे यांनी सांगितले. राज्यसभा निवडणुकीत जिंकण्यासाठी ४२ मतांची गरज आहे. या ४२ आमदारांना सफारी गाडी देण्यासाठी किती खर्च येईल, याचा हिशेबही निटुरे यांनी केला आहे. अरूण निटुरे यांनी ४५ सफारी गाड्यांचे कोटेशन सुद्धा घेतले आहे. टाटा सफारी गाडीची किंमत साधारण २६ लाख इतकी आहे. त्याप्रमाणे आपल्याला मतं देणाऱ्या सर्व आमदारांना गाडी द्यायची झाली तर निटुरे यांना जवळपास ११ कोटी ८१ लाख रुपये मोजावे लागतील. अरूण निटुरे यांच्या या ऑफरची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. एखादा अपक्ष आमदार किंवा लहान पक्षाने या ऑफरला भुलून निटुरे यांना मतदान केल्यास महाविकास आघाडी आणि भाजपला प्रत्येक मतासाठी झगडावे लागेल. मात्र, निटुरे यांची ही ऑफर घोडेबाजाराचा प्रकार ठरतो का, यासाठी त्यांच्यावर कोणती कारवाई होऊ शकते का, हे पाहावे लागेल.
मी आमदारांना आमिष दाखवत नाही: अरूण निटुरे
सर्व आमदारांनी, सर्व पक्षांनी मला सहकार्य करावं. एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून शेतकरी आमदारांनी मला मतदान करावं आण संसदेत पाठवावं. त्यांचे उपकार मी विसरणार नाही. मला जर संसदेत पाठवलं तर आमदारांना त्यांच्या मतदारसंघात काम करता यावं म्हणून सफारी गाडी देऊन मदत करु शकतो. हे लालच नाही तर कार्यकर्त्यांच्या सहभागातून त्यांना सहकार्य करु याची हमी देतो, अशी भूमिका अरूण निटुरे यांनी मांडली.
राज्यसभा निवडणुकीतील आकड्यांचं गणित?
सध्या महाविकास आघाडीकडे १६९ आमदार आहेत. शिवसेना ५५, राष्ट्रवादी ५४, काँग्रेस ४४, इतर पक्ष ८ आणि अपक्ष ८ असं महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. तर भाजपकडे ११३ आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे १०६ आमदार, रासप १, जनसुराज्य १ आणि अपक्ष ५ आमदार अशा एकूण ११३ आमदारांचं वजन भाजपकडे आहे.
राज्यसभेचा खासदार होण्यासाठी मतांचा कोटा किती असावा, यासाठीचं एक सूत्र आहे. यानुसार राज्यातील एकूण विधानसभा सदस्यांची संख्या भागिले (÷) राज्यसभेच्या रिक्त जागा +१ = आलेली संख्या + १ = संबंधित आलेली संख्या …….. हा विजयी उमेदवारांचा निकष
त्यानुसार २८८ ही महाराष्ट्र विधानसभेची संख्या ÷ राज्यसभेच्या रिक्त जागा ६ +१. म्हणजेच २८८ ÷६ = ४१.१४ अधिक १ = ४२