हिंगोली : अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. हिंगोली-औंढा महामार्गावर लिंबाळा औद्योगिक वसाहत परिसरात ३० मे रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. श्यामराव घुले (वय ५२) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. घुले यांना सामाजिक व धार्मिक कार्याची आवड होती. पंचक्रोशीतील विविध धार्मिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असे. त्यामुळे घुले यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील पार्डी येथील श्यामराव घुले हे सोमवारी त्यांच्या दुचाकी वाहनावर नरसी नामदेव येथे आले होते. या ठिकाणी काम आटोपल्यानंतर ते रात्री साडेआठ ते ९ वाजेच्या सुमारास परत गावाकडे निघाले. त्यावेळी अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात घुले यांच्या डोक्याला व हाता-पायाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे घुले यांचा जागीच मृत्यू झाला.

मुंबईतील वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर; यशवंत जाधव, महाडेश्वर, रवी राजांनी वॉर्ड गमावला

अपघाताची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर. एन. मळघने, जमादार संतोष वाठोरे, अशोक धामणे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृत श्यामराव घुले यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात नेला आहे. या प्रकरणात आज हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

दरम्यान, गोरगरीब कुटुंबातील लोकांना मदतीचा हात देणे, त्यांना आर्थिक सहकार्य करणे, सोबतच अध्यात्मिक कार्य आणि समाजहिताच्या कार्यक्रमात सहभाग घेणे हा श्यामराव घुले यांचा मूळ स्वभाव होता. त्यांच्या तळमळीमुळे पंचक्रोशीमध्ये घुले यांची वेगळीच ओळख निर्माण झाली होती. परंतु त्यांच्या अचानक जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here