sangali news: सांगलीत MIM च्या कार्यालयाबाहेर हळद-कुंकू टाकून जादूटोणा; घटनेनं जिल्ह्यात खळबळ – witchcraft outside mim’s office in miraj city in sangli district
सांगली : महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा आणण्यात आल्यानंतरही अंधश्रद्धेशी संबंधित अनेक प्रकार सुरूच असल्याचं पाहायला मिळतं. सांगली जिल्ह्यात तर थेट राजकीय पक्षाच्या कार्यालयाबाहेर काळी जादू करण्यात आल्याची घटना आता समोर आली आहे. सोमवती अमावस्याच्या पार्श्वभूमीवर मिरजेतील एमआयएम पक्षाच्या कार्यालयासमोर हा जादूटोणा करण्यात आला आहे. काळे उडीद आणि हळद-कुंकू फेकून काळी जादू करण्यात आल्याचं स्पष्ट झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
मिरज शहरातील किल्ल्याभाग येथे सांगली जिल्हा एमआयएम पक्षाचे जिल्हा कार्यालय आहे. जिल्हाध्यक्ष महेश कुमार कांबळे हे या ठिकाणाहून काम पाहतात. सोमवारी सोमवती अमावस्या होती आणि या दिवशीच अज्ञातांनी पक्षाच्या कार्यालयाच्या दारात काळे उडीद, हळद कुंकू फेकून ही काळी जादू केल्याचा आरोप एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेशकुमार कांबळे यांनी केला आहे. नाशिक मनपाची आरक्षण सोडत जाहीर; महत्त्वाच्या प्रभागांवर महिलांचं वर्चस्व
याबाबत महेशकुमार कांबळे म्हणाले की, सकाळी कार्यालय उघडायला आलो असता मला दारातल्या फरशीवर काळे उडीद आणि हळद-कुंकू आढळून आले. हा सर्व प्रकार जादूटोण्याचा आहे. याआधीही मागच्या काही महिन्यांमध्ये असाच प्रकार झाला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज पुन्हा हा प्रकार घडला आहे. जादूटोण्याचा हा प्रकार राजकीय विरोधातून करण्यात आल्याचा आरोप देखील महेशकुमार कांबळे यांनी केला आहे.
दरम्यान, राजकीय पक्षाच्या कार्यालयाबाहेर करण्यात आलेल्या या प्रकाराची जिल्ह्यात चांगलीच चर्चा होत असून याप्रकरणी पोलिसांकडून काय कारवाई केली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.