नागपूर: येथील आमदार निवासातील लिफ्ट सोमवारी अचानाक बंद पडल्याने एकच गोंधळ उडाला. या लिफ्टमध्ये तीन करोना संशयित महिला अडकल्या होत्या. लिफ्ट बंद पडल्याने त्यांनी घाबरून हाताने आणि पायाने लिफ्टचा दरवाजा आतून ठोठावून मदतीसाठी धावा केला. त्यानंतर लिफ्टमधील एआरडी यंत्रणा बंद पडली. अखेर काडीचा वापर करून एका कर्मचाऱ्याने अडकलेल्या तिन्ही महिलांना सुखरूप बाहेर काढले.

करोनाच्या संशयितांना आमदार निवास येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. १४ दिवस त्यांना आमदार निवास येथे ठेवण्यात येते. त्यांची सर्व व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात येत आहे. आमदार निवास येथील खोल्यांमध्ये जाण्यासाठी दोन लिफ्ट आहेत. यातील एक लिफ्ट सोमवारी अचानक बंद पडली. या लिफ्टमध्ये अडकलेल्या तीन संशयित महिला घाबरून गेल्या. त्यांनी इतरांना आवाज दिले, आवाज पोहोचत नसल्याने त्यांनी लिफ्टमधून हातापायाने ठोकले. लिफ्टमधून आवाज आल्याने आमदार निवासातील कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. मात्र एआरडी म्हणजेच ऑटोमेटिक रेस्क्यू डिव्हाइस बंद पडल्याने त्यांना बाहेर काढण्यात अडचणी आल्या. तेथील एका कर्मचाऱ्याने काडीच्या मदतीनं लिफ्टचा दरवाजा उघडला. अखेर त्या तीन महिलांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दुसऱ्या दिवशी लिफ्ट सुरू

आमदार निवासच्या इमारतीच्या देखभालीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. लिफ्टची दुरुस्ती करण्यात आली असून मंगळवारी ती सुरू झाली असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातील उपअभियंता लक्ष्मिकांत राऊळकर यांनी सांगितले. एआरडी यंत्रणा सुरू असती तर, तीन मिनिटांत त्यांना बाहेर काढणे शक्य झाले असते. एआरडी यंत्रणा बंद झाल्याने विलंब झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. नागरिकांनी मात्र या घटनेवर रोष व्यक्त करत प्रशासनाने अशा घटना होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याची मागणी केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here