अकोला : राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाशिवाय महानगरपालिका निवडणूक होणार नाही, असे जाहीर केले असले तरी आज मंगळवारी ओबीसी आरक्षणशिवाय अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभागांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यात ९१ पैकी ४६ जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. सामाजिक व महिला आरक्षण अंतिम होण्यापूर्वी हरकती व सूचनांसाठी ६ जूनपर्यंत वेळ मिळणार आहे.

प्रभाग रचना अधिसूचनेसोबतच प्रभागांचे सामाजिक आरक्षण लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार निश्चित झाले होते. त्यामुळे महिलांसाठी कोणते प्रभाग आरक्षित होतात याची उत्सुकता शिल्लक होती. तीन सदस्यीय प्रभागानुसार ‘अ’, ‘ब’, ‘क’ असे प्रभागाचे तीन भाग पाडून आरक्षण सोडत काढण्यात आली. मनपाचे ९१ पैकी १५ सदस्य हे अनुसूचित जातीचे व दोन सदस्य अनुसूचित जमातीचे आहेत. त्यातील अनुसूचित जातीच्या १५ पैकी आठ जागा महिलांसाठी तर अनुसूचित जमातीच्या दोन पैकी एक जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्यात.

मुंबईतील वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर; यशवंत जाधव, महाडेश्वर, रवी राजांनी वॉर्ड गमावला
त्यांची सोडत काढल्यानंतर प्रभागातील ‘अ’ गटाच्या उर्वरित २१ जागा या सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्यात. याशिवाय ज्या नऊ प्रभागातील ‘अ’ गट हे अनुसुचित जाती व जमातीसाठी राखीव झाले, त्या प्रभागातील नऊ ‘ब’ गट हे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले. महिला सदस्यांची संख्या ही ४६ असल्याने उर्वरित सात जागांसाठी २१ प्रभागातील ‘ब’ गटांच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्यात.

असं असेल आरक्षण

एकूण प्रभाग : ३०
एकूण जागा : ९१
महिलांसाठी राखीव : ४६
अनुसुचित जाती : १५ (पैकी आठ महिला)
अनुसुचित जमाती : दोन (पैकी एक महिला)
सर्वसाधारण : ७४ (पैकी ३७ महिला)

अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव जागा

अनुसुचित जातीच्या लोकसंख्येनुसार एकूण १५ प्रभागातील १५ अनुसुचित उमेदवाराकरीता राखीव आहे, यातील ८ जागांसाठी अनुसूचित जाती महिला राखीव झाले. ज्यात ३, ६, ९, १०, १२, १८, १९, २३ ‘अ’ जागा राखीव आहे.

केंद्राच्या योजनांमध्ये राज्याचा मोठा वाटा; राजकारण विसरून योजना पोहोचवल्या : मुख्यमंत्री
अनुसुचित जमाती महिलांसाठी राखीव जागा

अनुसूचित जमातीसाठी २ जागा असून यातील ‘२४-अ’ हि जागा अनुसूचितसाठी महिला राखीव असणार आहे.

सर्वसाधारण महिला राखीव जागा (३७) खालील प्रमाणे-

सर्वसाधारण महिलांसाठी ३७ जागा राखीव झाल्या. ज्यामध्ये १, ५, ७, ८, ११, १३, १५, १६, १७, २१, २२, २६, २८, ‘अ’ तर २, ३, ४, ६, ९, १०, १२, १४, १८, १९, २०, २३, २४, २५, २७, २९, ३० हे ‘ब’ या जागासाठी आरक्षित झाल्या. तर उर्वरित प्रभागातून चिठ्ठया टाकून आरक्षित केल्या. ज्यामध्ये १, ५, ८, १५, १७, २६, २८ ‘ब’ हे जागा सर्व साधारण महिलांसाठी आरक्षित झाल्या. असे एकत्रित ३७ जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव करण्यात आले.

नव्या आरक्षणामुळे दिग्गजांना बसला फटका

अकोल्याच्या भाजप महापौर अर्चना मसने, उपमहापौर राजेंद्र गिरी यांचे प्रभाग आरक्षित झाले. तर भाजपचे गटनेते राहूल देशमुखांचा प्रभागही महिलेसाठी राखीव झाला. त्यामुळे या दिग्गजांना दुसऱ्या प्रभागातून उभे रहावे लागण्याची शक्यता आहे. आजच्या आरक्षण सोडतीमुळे सध्याच्या महापालिकेतील किमान वीसवर विद्यमान नगरसेवकांना निवडणूक रिंगणाबाहेर रहावे लागण्याची शक्यता आहे. या आरक्षण सोडतीनंतर अकोला महापालिकेच्या राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली आहे.

महिला झाल्या आनंदित

महानगरपालिका निवडणुकीसाठी महिलांकरिता ४६ जागा राखीव झाल्या आहेत. पैकी काही प्रभागात दोन जागा या महिलांसाठी राखीव झाल्या असल्याने निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या अनेकांचा हिरमोड झाला आहे. प्रभागातील प्रत्येक पक्षाचा प्रभावी नेता जागा सोडणार नाही. त्यामुळे इच्छुकांना येथे घराच्या महिलांना निवडणूक रिंगणात उतरविणे भाग पडेल किंवा बाजूला सोयीचा प्रभाग निवडावा लागणार आहे.

सध्याच्या महापालिकेतील पक्षीय बलाबल

एकूण जागा : ८०

* भाजप : ४८
* काँग्रेस : १३
* शिवसेना : ०८
* राष्ट्रवादी : ०५
* वंचित बहूजन आघाडी : ०३
* एमआयएम : ०१
* अपक्ष : ०२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here