ट्रेन सुरू होणार आहेत, अशी अफवा पसरवण्यात आल्यानंतर मंगळवारी सायंकाळी वांद्रे स्टेशनबाहेर परराज्यातील मजुरांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी जमावाची समजूत काढल्यानंतर परिस्थिती निवळली होती. मात्र, इतक्या मोठ्या संख्येने मजूर वांद्रे स्टेशनबाहेर जमलेच कसे, याचा शोध पोलीस आता घेत असून याप्रकरणाची अनेक बाजूंनी चौकशी करण्यात येत आहे.
ट्रेन सुरू होणार असल्याची अफवा पसरवणाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश मंगळवारी रात्रीच गृहमंत्र्यांनी दिले होते. या अफवेमागे जे कुणी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले होते. त्यानुसार पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. ही गर्दी जमा करण्यामागे हात असलेला उत्तर भारतीय संघाचा अध्यक्ष विनय दुबे याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याचवेळी इतर राज्यातील मजुरांना गावी जाता यावे म्हणून विशेष रेल्वेगाड्या सोडल्या जाणार आहेत, असे वृत्त देणाऱ्या एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारालाही पोलिसांनी अटक केली आहे.
विनय दुबेला मी ओळखत नाही
विनय दुबेबाबत देशमुख यांनी स्पष्टीकरण दिले आहे. विनय दुबेला मी ओळखत नाही. ८ दिवसांपूर्वी मंत्रालयात भेटायला आलेल्या व्हिजिटर्समध्ये एक रिक्षावाला होता. त्याने मंत्रालयात मुख्यमंत्री उपस्थित नसल्यामुळे माझ्याकडे २५ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला. माझ्या चेंबरमध्ये हा धनादेश त्याने मला दिला. त्यावेळी त्याच्यासोबत जो व्यक्ती होता, तो बहुदा विनय दुबे होता, असे देशमुख यांनी नमूद केले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times