राज ठाकरे यांनी गेल्या तीन-चार दिवसांपासून पक्षातील नेत्यांच्या बैठका घेतल्या होत्या. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध नेत्यांशी वन टू वन बातचित करत त्यांना सूचना केल्या होत्या. तसेच वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संबोधितही केलं होतं. त्यानंतर आज ते लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल झाले. तत्पूर्वी शस्त्रक्रियेपूर्वीच्या तपासण्यांतून त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांच्या पायाच्या जुन्या व्याधीने डोके वर काढले होते. राज ठाकरे हे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, पायाचे दुखणे बळावल्याने त्यांना अयोध्या दौरा रद्द करावा लागला होता. त्यानंतर राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया होणार असल्याचं निश्चित झालं होतं. उद्या ही शस्त्रक्रिया होणार होती. मात्र आता कोरोनातून सावरल्यानंतर शस्त्रक्रिया करणार येईल, अशी प्राथमिक माहिती मिळतीये.
कोविड डेड सेलमुळे ॲनेस्तेशिया देऊ शकत नाही
कोविड डेड सेलमुळे ॲनेस्तेशिया देऊ शकत नसल्यामुळे लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मनसेचे सचिव सचिन मोरे यांनी दिली आहे.
राज ठाकरे यांना याअगोदरही कोरोनाची बाधा
राज ठाकरे यांना याअगोदरही कोरोनाची बाधा झाली होती. २३ ऑक्टोबर २०२१ रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. पहिल्यांदा राज यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे यांना कोरोनाची बाधा झाला. त्यानंतर राज यांच्या भगिनीला कोरोनाने ग्रासलं आणि नंतर स्वत: राज ठाकरे यांना देखील कोरोनाने गाठलं. सौम्य लक्षणे असल्याने राज यांनी त्यावेळी घरीच उपचार घेतले होते.