मुंबई: वांद्रे स्टेशनबाहेर बेकायदेशीरपणे झालेल्या मजुरांच्या ठिय्या आंदोलन प्रकरणी पोलिसांनी आणखी ९ जणांना अटक केली आहे. बेकायदा जमाव जमवून दंगल घडवल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली असून या सर्वांना उद्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

‘चलो घर की ओर’ अशी सोशल पोस्ट टाकत वांद्रे स्टेशनबाहेर जमण्यासाठी मजुरांना आवाहन करणारा उत्तर भारतीयांचा नेता विनय दुबेला पोलिसांनी आधीच अटक केली आहे. त्याला २१ एप्रिलपर्यंत कोठडी देण्यात आली आहे. त्याशिवाय ट्रेन सुरू होण्याबाबत चुकीचे वृत्त दिल्याप्रकरणी एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारालाही अटक करण्यात आलेली आहे. त्यानंतर आता प्रत्यक्ष आंदोलन प्रकरणी ९ जणांना अटक करण्यात आली आहे. या ९ जणांवर दंगल घडवल्याचा आरोपही ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, ट्रेन सुरू होणार आहेत, अशी अफवा पसरवण्यात आल्यानंतर मंगळवारी सायंकाळी वांद्रे स्टेशनबाहेर परराज्यातील मजुरांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी जमावाची समजूत काढल्यानंतर परिस्थिती निवळली होती. मात्र, इतक्या मोठ्या संख्येने मजूर वांद्रे स्टेशनबाहेर जमलेच कसे, याचा शोध पोलीस आता घेत असून याप्रकरणाची अनेक बाजूंनी चौकशी करण्यात येत आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here