एनएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, केके यांच्या मृत्यूनंतर पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यू झाल्याची केस दाखल झाली आहे. आता पोलीस त्यादृष्टीने तपास करण्याची शक्यता आहे. मात्र, केके यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतरच अनेक गोष्टी स्पष्ट होतील. केके यांच्या कुटुंबीयांची अनुमती मिळाल्यानंतर त्यांचे शवविच्छेदन करण्यात येईल. त्यासाठी एसएसकेएम रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे.
या सगळ्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांकडून सध्या कोलकाताच्या कॉन्सर्टचे आयोजक आणि हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु आहे. केके यांच्या डोक्यावर आणि ओठावर जखमी असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे या प्रकरणातील गूढ वाढले आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती पुढे आलेली नाही.
भाजप नेत्याकडून चौकशीची मागणी
केके यांच्या मृत्यूनंतर पश्चिम बंगालमध्ये राजकारणाला सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगालमधील भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी काही प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारला धारेवर धरले आहे. ज्या पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आले ती पद्धत योग्य नाही, याची चौकशी झाली पाहिजे. तेथील एसी बंद होता, तसेच खूप गर्दीही होती. क्षमतेपेक्षा जास्त गर्दी तेथे होती. या कारणामुळे त्यांची तब्येत बिघडली की काय, हे माहीत नाही. कारण अशा कार्यक्रमांमध्ये लोकांमध्ये एक्साइटमेंट असते, असे दिलीप घोषण यांनी म्हटले.