नागपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील अल्पवयीन पीडितेच्या अर्भकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली.

मैत्रिणीच्या वडिलांनी केलेल्या अत्याचारातून गर्भवती झाल्याने पीडितेने गर्भपात करण्याची परवानगी मिळावी म्हणून नागपूर खंडपीठामध्ये फौजदारी जनहित याचिका दाखल केली होती. याचिकेनुसार, पीडित मुलगी चंद्रपूर जिल्ह्यातील शेगाव येथील रहिवासी असून आरोपी योगेश रामचंद्र दोहतारे याने तिच्यावर बलात्कार केला. त्यामुळे, तिला गर्भधारणा झाली असा आरोप आहे.

यासंदर्भात १४ मार्च २०२० रोजी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. त्यावेळी ती २३ आठवड्यांची गर्भवती होती. उच्च न्यायालयाने मुलीची तपासणी व अहवाल सादर करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे मंडळ स्थापन केले होते. त्या मंडळाने मुलीची तपासणी करून गेल्या आठवड्यात अहवाल सादर केला व मुलीचे बाळ जिवंत जन्माला येऊ शकते, असे सांगितले. त्यामुळे न्यायालयाने अशा बाळांच्या संगोपनासाठी काय योजना आहे अशी विचारणा सरकारला करून १५ एप्रिलपर्यंत उत्तर मागितले होते.

दरम्यान, १२ वर्षीय पीडितेची प्रकृती अचानक बिघडली. डॉक्टरांना अर्भक बाहेर काढण्याची वेळ आली. मुलीची प्रकृती खालावल्यामुळे डॉक्टरांना न्यायालयाच्या परवानगीशिवाय शल्यक्रिया करावी लागली. त्यातच अर्भकाचा मृत्यू झाल्याचे शासनातर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. न्यायालयाने राज्य सरकारला या घडामोडीवर प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा आदेश दिला आहे. पीडित मुलीतर्फे अॅड. स्वीटी भाटिया तर, सरकारतर्फे अॅड नितीन राव यांनी बाजू मांडली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here