वसंत मोरे मागील काही महिन्यांपासून मनसेत नाराज आहेत. भरीस भर म्हणजे पुण्याच्या शहराध्यक्षपदावरुन देखील त्यांना तत्काळ हटवलं गेलं. मनसेच्या भोंग्याविरोधातल्या आंदोलनात देखील त्यांचा सक्रीय सहभाग नव्हता. राज ठाकरे यांच्या महत्त्वकांक्षी भोंगेविरोधी आंदोलनाला त्यांनी कडाडून विरोध दर्शवला. त्याचमुळे महाराष्ट्र भर वसंत मोरे यांची चर्चा झाली. दरम्यानच्या काळात त्यांना अनेक पक्षांनी ऑफर दिल्या. मात्र मी मनसेतच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
तत्पूर्वी पुण्यातील एका लग्नसमारंभात संजय राऊत आणि वसंत मोरे यांची भेट झाली. या भेटीत राऊतांनी वसंत मोरे यांचं तोंडभरुन कौतुक केलं. ‘तुम्ही खूप भारी काम करताय’, अशी स्तुती राऊतांनी केली. यादरम्यान राऊतांनी वसंत मोरे यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. वसंत तात्यांनीही राऊतांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. काही वेळाच्या भेटीनंतर ‘पुन्हा भेटू’ म्हणत दोघांनीही एकमेकांचा निरोप घेतला.
उद्धव ठाकरे यांनीही वसंत तात्यांना फोन केला होता
पुणे मनसे शहराध्यक्ष पदावरून गेल्या महिन्यात वसंत मोरेंना हटवण्यात आलं. त्यानंतर वसंत मोरेंना इतर पक्षांकडून पक्षात येण्याच्या ऑफर आल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील वसंत मोरेंना फोन केला होता. वरुण देसाई यांनी वसंत तात्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, यासाठी प्रयत्न केले. पण सध्या माझा पक्ष सोडण्याचा कुठलाच विचार नाही, असं स्पष्ट करत तात्यांनी अनेकांच्या ऑफर फेटाळून लावल्या.