आदिला आणि फातिमा यांना कुटुंबीयांनी जबरदस्तीनं वेगळं केलं होतं. यानंतर आदिलानं उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. बिनानीपुरम पोलिसांनी फातिमा नुरा यांना न्यायालयासमोर हजर केलं. या प्रकरणी न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन आणि सी. जयचंद्रन यांच्या खंडपीठानं सुनावणी घेतली. तुम्हाला एकत्र राहायचं आहे का, असा सवाल न्यायमूर्तींनी दोघींना विचारला. दोघींनी होकारार्थी उत्तर दिल. यानंतर न्यायालयानं त्यांच्या बाजूनं निकाल दिला. आदिला नसरीन २२ वर्षांच्या असून फातिमा नुरी २३ वर्षांच्या आहेत.
फातिमा नुरा यांच्यासोबत असलेल्या संबंधांवर बोलताना आदिला यांनी कुटुंबीयांकडून झालेला त्रास सांगितला. फातिमासोबत राहण्याची इच्छा असल्यानं बहिष्कार सहन करावा लागला. जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या. फातिमाच्या आईनं माझ्याविरोधात अपहरणाची तक्रार दाखल केली होती, अशा शब्दांत आदिलानं आपली व्यथा मांडली.
आम्ही समलैंगिक जोडपं आहेत. शाळेच्या दिवसांपासून आम्ही सोबत आहोत, असं नसरीन यांनी सांगितलं. आमच्या आई-वडिलांनी आम्हाला पकडलं. पण आम्ही त्यांना आमच्यात काहीच नसल्याचं सांगितलं. आम्ही खोटं बोललो आणि आमच्यात असलेलं नातं कायम ठेवलं. पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्ही घर सोडलं. त्यानंतर परिस्थिती बदलली. माझ्या आई-वडिलांनी आमची जबाबदारी घेतली. मात्र त्यांनी आम्हाला मानसिक त्रास दिला, अत्याचार केले, असं नसरीन म्हणाल्या.