पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९७ व्या जयंतीच्या निमित्ताने अहमदनगरच्या चौंडीत हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी चौंडी येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला शरद पवारही उपस्थित होते. याठिकाणी जाण्यासाठी निघालेल्या गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या गाड्यांचा ताफा पोलिसांनी अडवला. यावरुन पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. शरद पवार यांनी पोलिसांच्या माध्यमातून कितीही दबाव आणला तरी आम्ही चौंडीला जाणारच, चौंडीचा सातबारा पवारांच्या नावावर आहे काय? पवारांचं राजकारण जेव्हा बहुजन पोरांना समजेल तेव्हा बहुजन पोरं आजोबा-नातवाच्या छाताडावर नाचल्याशिवाय राहणार नाही, अशी बोचरी टीका पडळकर यांनी केली.
गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल
धनगर समाजातील विविध संघटनांनीच पडळकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. कलम ५०५ (२) अन्वये पडळकर यांच्याविरोधात कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.समाजा-समाजात तेढ निर्माण करणे, चिथावणीखोर वक्तव्य करणे, अशा कलमाखाली पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्यासमोरील अडचणी वाढल्याचं बोललं जात आहे.