उत्पादन शुक्ल विभागातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, राज्य सरकार या सगळ्याचे कायदेशीर आणि सामाजिक पैलू लक्षात घेऊन याबाबत निर्णय घेईल. तोपर्यंत मद्याच्या होम डिलिव्हरीची सेवा सुरू राहील. करोना काळात सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल, या उद्देशाने मद्य घरपोच पोहोचवण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर अनेकांनी दुकानात जाऊन दारू खरेदी करण्यापेक्षा होम डिलिव्हरीचा पर्याय निवडला होता. तेव्हापासून मद्याच्या होम डिलिव्हरीचे प्रमाण वाढले होते. आता ही सेवा बंद झाल्यास मद्यप्रेमींची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
गृहखात्याने उत्पादन शुल्क विभागाला मद्यविक्रीची पूर्वीची व्यवस्था पुन्हा अंमलात आणण्यास सांगितल्याची माहिती आहे. करोना काळातील निर्बंध उठवण्यात आले आहेत. त्यामुळे घरपोच मद्यविक्रीसाठी देण्यात आलेली होम डिलिव्हरीची परवानगीही आपोआपच रद्द होईल, असे गृहखात्याने उत्पादन शुल्क विभागाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
घरातील सर्वच वस्तूंबरोबर आता दारुही ऑनलाइन मागवण्याचे प्रमाण वाढले आहे. मलबार हिल, कुलाबा, नेपियन्सी रोड, पवई, आंबोली यांसारख्या उच्चभ्रू भागांमध्ये वाइन, बियर, मद्य अधिक प्रमाणात घरपोच मागवले जाते. दारुच्या दुकानांचा संपर्क क्रमांक शोधण्यासाठी गुगलचा सर्रास वापर केला जातो. मात्र, यामुळे फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. ऑनलाइन भामट्यांनी ग्राहकांची ऑनलाइन मागवण्याची ही पद्धत अचूक हेरली होती. विविध वाइन शॉपच्या नावांवर गुगलमध्ये असलेल्या मोबाइल क्रमांकांत फेरफार करण्यात आले होते. या माध्यमातून लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या.