म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

शहरात छोट्या घरांमध्ये राहणाऱ्या अनेकांच्या घरांमध्ये शौचालयांची सुविधा नाही. त्यामुळे या व्यक्तींना सार्वजनिक शौचालयांवर अवलंबून राहावे लागते. वरळी कोळीवाड्यांमध्ये पॉझिटिव्ह आढळून आलेल्या एका साठ वर्षीय व्यक्तीला घरामध्ये शौचालय नसल्याने शेजाऱ्यांच्या शौचालयाचा वापर केल्यामुळे संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. शौचालये नसल्यामुळे या परिस्थितीचा सामना अनेकांना करावा लागतो.

वरळी येथील व्ही. एस. पवार (नाव बदलले आहे ) यांचा मृत्यू करोनाच्या संसर्गामुळे झाला. शेजाऱ्यांशी अनेक वर्षाचे घट्ट नाते असल्यामुळे उठबसही होती. वय झाल्याने शेजारच्यांचे शौचालय वापरले जात असे. या घरातील एका व्यक्तीचा करोनामुळे मृत्यू झाल्यामुळे परिसरातील व्यक्तींनीही करोनासाठी वैद्यकीय चाचणी करून घेतली. तेव्हा हे वयोवृद्ध व त्यांची मुलगी पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले.

त्यांनी पालिकेच्या हेल्पलाइन क्रमाकांवर संपर्क साधला असता तिथे सध्या खाटा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.. दुपारी या कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलीला पोद्दार रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

डॉक्टरकडे आली आणि वरळीत अडकली

नालासोपारा येथे राहणारी या व्यक्तीची मुलगी डॉक्टरकडे आली आणि भाग सील झाल्यामुळे तेथेच अडकली. तिला बाहेर जाता आले नाही. या कुटुंबातील तिघांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यांच्या ३५ वर्षीय मुलाची चाचणी निगेटिव्ह आली असली तरीही त्याला संध्याकाळपासून ताप आणि श्वास घ्यायला त्रास होत होता. घरी विलगीकरण करण्याचा सल्ला देण्यात आल्याने तो एकटाच घरी आहे. पालिकेच्या हेल्पलाइनवर तो सतत संपर्क साधत होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here