करोनाच्या संकटामुळे सेल्फ क्वारंटाइन व्हावं लागण्याचा अनुभव अभिनेत्री पर्ण पेठेनं नुकताच घेतला. तिचा क्वारंटाइनचा हा काळ नुकताच संपला आहे. ‘एकामागोमाग एक घडलेल्या या सर्व घटनांमुळे, आयुष्य अनिश्चित असून कधीही कोणाला गृहीत धरू नये हे मी शिकले’, असं पर्ण म्हणते.
मार्चमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला तेव्हा अभिनेत्री पर्णा पेठे ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकाच्या प्रयोगासाठी संपूर्ण टीमबरोबर अमेरिकेत होती. म्हणून तिला तातडीनं मुंबईत येऊन सेल्फ क्वारंटाइन होणं अनिवार्य होतं. अमेरिकेहून मुंबईत येऊन सेल्फ क्वारंटाइन होण्याचा हा अनुभव नुकताच तिनं सांगितला. ती म्हणाली, की ‘एक महिन्याआधी मी अमेरिकेला जाण्यासाठी उत्साहात होती. पण नंतर काहीच दिवसांत सारं काही बदलून गेले. करोनाला साथी आजार घोषित केल्यानंतर आमच्या नाटकाचे प्रयोग रद्द झाले. तातडीनं आम्हाला मुंबईत यावं लागणार असल्यानं आधी विमानतळ गाठलं. पण तिथेही अनेक विमानं रद्द झाल्याचं आम्हाला कळलं. आम्हाला तासनतास वाट पाहावी लागली. मुंबईत आल्यावरही मनावर ताण कमी नव्हता. कशीबशी टॅक्सी मिळून पुण्याला घरी पोहोचले. अमेरिकेतून आले असल्यामुळे सक्तीनं सेल्फ क्वारंटाइन होण्याचं टेन्शन होतंच. पुण्यात जिथे पहिला करोना रुग्ण आढळला तिथेच मी देखील राहत असल्याने मनावर खूप ताण होता. सुदैवानं आता सर्व व्यवस्थित झालं असून सेल्फ क्वारंटाइन होण्याचा काळ संपला आहे.’
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times