तर दुसरीकडे पोलिसांच्या या पवित्र्यामुळे राज्याच्या इतर भागांमध्येही मनसैनिक राज ठाकरे यांचे पत्रक वाटायाला गेल्यास त्यांच्यावर अशाप्रकारची कारवाई होऊ शकते. त्यामुळे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) याविरोधात आक्रमक होणार का, हे पाहावे लागेल.
राज ठाकरेंच्या पत्रकात नेमकं काय?
राज ठाकरे यांनी गेल्या महिन्यात पुण्यात सभा घेतली होती. त्या सभेत त्यांनी सांगितलं होतं की ते भोंगे प्रकरणावर एक पत्र लिहिणार आहेत आणि ते पत्र मनसैनिकांनी संपूर्ण राज्यातील जनतेपर्यंत पोहोचवायचंय असंही त्यांनी सांगितलं होतं. त्याच पत्राबाबत त्यांनी गुरुवारी एक ट्विट करत मनसैनिकांना आदेश दिले होते.
१. जिथे-जिथे आवाजाच्या नियमाचे पालन होत नसेल तिथे-तिथे तुम्ही स्वाक्षरी मोहीम राबवून स्थानिक पोलिसांना कळवावे.
२. लाऊडस्पीकरच्या आवाजाचा त्रास झाल्यास तुम्ही घरातूनच स्वतःच्या मोबाईलवरून १०० क्रमांक डायल करून पोलिसांना सतत माहिती देऊ शकता.
३. माझं हे पत्र घेऊन तुमच्या घरी येणारा माझा जो महाराष्ट्र सैनिक आहे, त्याचं नाव आणि मोबाईल क्रमांक तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. कोणत्याही संकटात, अडीअडचणीच्या वेळी माझा हा महाराष्ट्र सैनिकच तुमच्यासाठी धावून येईल.
जयंत पाटलांची मनसेवर बोचरी टीका
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा घराघरापर्यंत पोहोचेल इतका काही मोठा पक्ष नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. यावेळी जयंत पाटील यांनी मनसेची अप्रत्यक्षपणे खिल्ली उडवली. राज ठाकरे यांचा मनसे हा पक्ष घराघरापर्यंत पोहोचेल इतका काही मोठा नाही. त्यांनी जे पत्रक काढलं आहे, ते कुठपर्यंत पोहोचतंय त्याला कशाप्रकारे प्रतिसाद मिळतो, हे पाहून बोलेन, असे जयंत पाटील यांनी म्हटले. यावरून आता मनसेचे नेते आक्रमक होण्याची शक्यता आहे. ते जयंत पाटील यांच्या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.