तेव्हा पंकजा मुंडे यांनी विधानपरिषद उमेदवारीबाबत सूचकरित्या भाष्य केले. मला विधानपरिषदेची उमेदवारी मिळावी, ही लोकांची इच्छा आहे. हीच माझी शक्ती आहे. आता पक्ष याबाबत लवकरच निर्णय घेईल. घोडामैदान फार लांब नाही, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले. यावेळी पंकजा मुंडे यांना, गेल्या अडीच वर्षांमध्ये भाजपने तुम्हाला विधानपरिषदेत जाण्याची संधी का दिली नाही, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पंकजा यांनी म्हटले की, मी संधीची अपेक्षा करत नाही, तो माझा स्वभाव नाही. राजकारणात संधी मिळावी म्हणून वाट पाहणाऱ्यांपैकी मी नाही. मी जे मिळेल त्यामधूनच संधी निर्माण करते. गोपीनाथ मुंडे यांनीही जे जे पद भुषवले, ते आपल्या कर्तृत्त्वाने मोठे करून दाखवले. त्यामुळे आमच्यावर ‘चिंधीचं सोनं करावं’, हे संस्कार झाले आहेत. त्यामुळे मी कोणत्याही संधीची वाट पाहत नाही. ती माझी प्रवृत्तीच नाही, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
पंकजा मुंडेंना विधानपरिषदेसाठी संधी मिळणार?
राज्यसभा निवडणुकीतही भाजप पंकजा मुंडे यांना संधी देईल, असे बोलले जात होते. मात्र, शेवटच्या क्षणी सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिक यांचे नाव जाहीर झाल्याने पंकजा मुंडे (Pankaja Munde) समर्थकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले होते. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष विधानपरिषद निवडणुकीकडे लागले आहे. भाजपकडून पंकजा मुंडे यांना संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पंकजा मुंडेही यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनीही पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक संकेत दिले होते.
पंकजा मुंडे आमच्या मोठ्या नेत्या आहेत. आमच्याकडून त्यांच्या नावाला पूर्ण पाठिंबा आहे. अशा काही निवडणुका होतात, तेव्हा त्यांचं नाव चर्चेत येतं. ते साहजिकच आहे. त्यांचं नाव चर्चेत येणं यात काहीच वावगं नाही. त्या कोणत्याही पदासाठी पात्र आहेत. आमच्या त्यांच्या नावाला पाठिंबा आहे. आम्ही पूर्णपणे सकारात्मक आहोत. याबद्दलचा निर्णय आमचे हायकमांड घेतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.